Your Own Digital Platform

सातार्‍यात स्वाईन फ्लूचा फैलाव वाढला


सातारा : सातारा जिल्ह्यात स्वाईन फ्लूने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मृतांची संख्या 16 च्या घरात जाऊन पोहोचल्याने घबराट निर्माण झाली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय तथा सिव्हिलमध्ये स्वाईन फ्लूची लस उपलब्ध नसल्याने व खासगी दवाखाने भरमसाट पैसे घेत असल्याने सामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. स्वाईनचा विळखा शाळांपर्यंत जाऊन पोहोचल्याने शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. सिव्हिल विरोधात संतापाची लाट उसळली असून, निष्क्रिय सिव्हिल सर्जन तातडीने हाकला, अशा संतप्त प्रतिक्रिया सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. स्वाईन फ्लूने सातारकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सन 2009 मध्ये या साथीची सातारा जिल्ह्यात मोठी लागण झाली होती. अवघे जनजीवन त्यावेळी कोलमडून पडले. विशेषत: शालेय विद्यार्थी या साथीने पछाडले होते. शाळांच्या कामकाजावरही विपरीत परिणाम झाल्यानंतर शाळांना तर सुट्टी देण्यात आली होती.

तशीच स्थिती आता पुन्हा उद्भवण्याचा धोका आहे. सिव्हील प्रशासन अजूनही स्वाईन फ्लू या विषयावर गंभीर नसल्याचेच समोर आले आहे. दररोज स्वाईन फ्लू संशयित, बाधीत रुग्ण वाढत आहेत. स्वाईन फ्लूने मृत्यूमुखी पडणारांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. महिला-पुरुषांसह शाळकरी मुलांवरीलही स्वाईन फ्लूचा विळखा घट्ट होत चालला आहे. दोन दिवसांपूर्वी सातार्‍यात एका नामांकित शाळेतील मुलीला स्वाईन फ्लू झाला असल्याची माहिती समोर आली. त्या मुलीच्या वडिलांवर स्वाईन फ्लूचे उपचार सुरु असतानाच तिचीही प्रकृती बिघडल्याने तिच्यावर स्वाईन फ्लूचे उपचार सुरु करण्यात आले. या घटनेची माहिती इतर पालकांना समजल्यानंतर त्यांनी शाळा प्रशासनाकडे त्याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. समोर आलेल्या माहितीनंतर पालकांनी शाळेला सुट्टी देण्याचे सांगून मुलांवर उपचारांना सुरुवात केली आहे.

एकाच आठवड्यात शाळांमधील हे भीषण वास्तव समोर आल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी सिव्हील आरोग्य यंत्रणेचा किती ढिसाळ कारभार सुरु आहे याचेच वास्तव समोर आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमोद गडीकर यांच्याकडे याबाबत कोणताच आराखडा नसून त्याबाबत उपाययोजना करण्यात ते अपयशी ठरल्याचे दिसत आहे. त्यांच्या विरोधात तक्रारी घेवून अनेक शाळांमधील पालक बुधवारी ‘पुढारी’त आले. सिव्हिलमध्ये कोणतीच यंत्रणा उपलब्ध नसल्याची माहिती या पालकांनी दिली.

सिव्हीलमध्ये स्वाईन फ्लू नियंत्रण कक्ष आहे मात्र त्यामध्ये उणेपुरे 18 एवढेच बेड आहेत. यामुळे स्वाईन फ्लू संशयित रुग्ण आल्यानंतर त्याची खासगीमध्ये बोळवण केली जात असल्याचेही वास्तव आहे. सातारा शहरातील हे विदारक वास्तव असताना जिल्ह्याच्या आरोग्याचाही बट्ट्याबोळ झालेला आहे. सातारा जिल्ह्यात आरोग्य विभागांतर्गत 15 ग्रामीण रूग्णालये, 1 कुटीर रूग्णालय, 1 सामान्य रूग्णालय, 2 उपजिल्हा रूग्णालय, 71 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. यामध्ये स्वाईन फ्लूवर मोफत मोफत उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. मात्र स्वाईन फ्लूची लस नसल्याने हे कागदोपत्री रंगवल्या जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. आरोग्य यंत्रणेने तातडीने स्वाईन फ्लूवर उपाययोजना केल्या नाहीत तर नागरिकांना तीव्र आंदोलन छेडावे लागणार आहे.