Your Own Digital Platform

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली : चंद्रकांत पाटील


कलेढोण : देशात व राज्यात भाजप सरकार मोठ्या प्रमाणात विकासकामे करत असल्याचे पाहून दोन्ही काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. सत्ता मिळवण्यासाठी एकत्र लढण्याचे काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीर केले असून हिंमत असेल तर त्यांनी वेगवेगळे राहून निवडणूक लढवावी, असे आव्हान महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी दिले.

मायणी येथील धरणात टेंभू योजनेचे पाणी नेण्याच्या कामाचा शुभारंभप्रसंगी आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. याप्रसंगी जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन, पशुसंवधर्नन मंत्री ना. महादेव जानकर, सहकार मंत्री ना. सुभाषराव देशमुख, कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष खा. संजयकाका पाटील, सहकार परिषद अध्यक्ष शेखर चरेगावकर, विठ्ठल रुक्मिणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अतुल भोसले, सदाशिवराव खाडे, भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, पं. स. सदस्या सौ. मेघाताई पुकळे, मायणी सरपंच सचिन गुदगे, उपसरपंच सूरज पाटील, सदस्य विजय कवडे, आनंदराव शेवाळे, जगन्नाथ भिसे, मायणी भाजपाध्यक्ष जालिंदर माळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, गेली 40 वर्षे काँग्रेसने जनतेला फसवले. त्यामुळे जनतेने त्यांना दूर केले. यापुढेही जनता त्यांना कधीही सत्तेत येवू देणार नाही. मायणीच्या धरणात पाणी येण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येईल. विरोधकांकडे आमच्यावर बोलण्यासारखा मुद्दाच राहिला नाही. खा. सुप्रिया सुळे खड्ड्यांचा सेल्फी काढून जनतेत आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहेत. पावसाळा संपला की तात्काळ खड्डे भरले जाणार आहेत. यापुढे सेल्फी काढण्यासाठी त्यांना परदेशात जावे लागेल. दरम्यान डॉ. येळगावकर यांच्या कार्याचा त्यांनी आपल्या भाषणात गौरव केला.

जलसंपदामंत्री ना. गिरीष महाजन म्हणाले, मायणीच्या धरणात पाणी येण्याचे काम 150 दिवसांऐवजी 90 दिवसांतच पूर्ण व्हावे. तशा सूचना त्यांनी अधिकार्‍यांना दिल्या. चितळी टेंभू लाभ क्षेत्रात समाविष्ट होण्यासाठी आपण प्रयत्न करु. खटाव व माण भागात राहिलेल्या विकासकामांचा सर्व्हे करण्याचे आदेश त्यांनी अधिकार्‍यांना दिले.

ना. महादेव जानकर म्हणाले, मराठा व धनगर समाजाला आरक्षण हे भाजप सरकारच देणार आहे. माण तालुक्यातील बिजवडीसह उत्तर भागातील सर्व गावांना तसेच खटाव तालुक्यातील सातेवाडी, पेडगावसह तडवळे, एनकूळ, कणसेवाडी या गावांना जिहे कठापूरचे तर शिंगणापूर, मार्डी परिसराला धोम बलकवडीचे पाणी मिळावे. प. महाराष्ट्राला लवादाने दिलेल्या जादा 81 टीएमसी पाण्यातील 7 ते 8 टीएमसी पाणी वरील योजनांसाठी आणून सिंचन क्षेत्र वाढवण्यात यावे. दरम्यान खटाव- माण मतदार संघासाठी जो उमेदवार पक्ष देईल तो निवडून आणू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

डॉ. दिलीप येळगावकर यांनी दुष्काळी भागातील जनतेच्या मागण्या मांडल्या. कलेढोण - गारळेवाडीसह खटाव तालुक्यातील पूर्व भागात सिंचनासाठी टेंभूचे, औंधसह 16 गावांना ब्रह्मपुरी योजनेचे पाणी मिळावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी ना. सुभाषराव देशमुख, खा. संजयकाका पाटील तसेच भाजपा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. सचिन गुदगे यांनी स्वागत करुन ग्रामपंचायत मायणीतर्फे केलेल्या कामाचा आढावा घेतला.