Your Own Digital Platform

जिल्हा पोलिस प्रमुखांकडून विसर्जन मार्गाची पाहणी


सातारा : सातारा शहरातील गणेश विसर्जन मार्गाची आज सकाळी सुमारे आठच्या दरम्यान सातारा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्यासह पाहणी केली.गणेश विसर्जनाचा तिढा नुकताच सुटलेला आहे. मानपमान नाट्यावर पडदा पडल्यानंतर, पालिकेने तत्काळ युद्धपातळीवर राधिका रस्त्यालगत असणाऱ्या प्रतापसिंह शेती फार्म मध्ये कृत्रिम तळ्याची निर्मिती सुरू केली आहे. 

या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी सातारा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, पोलीस उपाधीक्षक गजानन राजमाने, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पो.नि. किशोर धुमाळ, पो.नि. बेंद्रे यांनी राजपथासह शहरातील इतर विसर्जन मार्गाची पाहणी केली. तसेच कृत्रिम तळ्याचे खोदकाम सुरु असलेल्या ठिकाणी भेट दिली. सकाळी पाहणी झाल्यानंतर गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांकडून सकाळी गर्दी नसते मात्र रात्रीच्या वेळी या मार्गाची पाहणी करावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतरच साताऱ्यातील सद्य स्थिती समजेल.

दरम्यान, पोलिस अधीक्षकांनी विसर्जन मार्गाची पाहणी केल्यानंतर अनेक मंडळांचे धाबे दणाणले आहेत. गणेश विसर्जनादिवशी सातारा शहरात डॉल्बी वाजणारच नाही, याची खबरदारी पोलीस घेत आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गणेश मंडळांच्या विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी डॉल्बी सिस्टम सील केल्यामुळे जिल्ह्यात डॉल्बी वाजणार कशी याची हूर-हूर गणेश मंडळांना लागली आहे.