Your Own Digital Platform

यंदाच्या गणेशोत्सवात फक्त ढोल-ताशांचा गजर


सातारा : गणेशोत्सव आता दहा दिवसांवर येवून ठेपलेला असताना साताऱ्यासह जिल्ह्यात सर्वत्र गणरायाच्या आगमनाठी लगबग सुरू झाली आहे. घरगुती गणेश मुर्तींचे स्टॉल्स ठिकठिकाणी उभारण्यात आले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते मुर्तीकारांच्या ठिकाणी ठाण मांडून आहेत. त्याचबरोबर सजावटीचे साहित्यांनी बाजारपेठा फुलल्या आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकांमध्ये यंदाच्या वर्षी ही डॉल्बीला एंट्री मिळणार नसल्याने साहजिकच फक्त ढोल- ताशांचा गजर होणार आहे.

मागील काही वर्षांपूर्वी साताऱ्यात विसर्जन मिरवणुकी दरम्यान साताऱ्यात डॉल्बीच्या दणदणाटाने इमारतीची भिंत कोसळून दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने सतर्क होत पुढील गणेशोत्सवांमध्ये डॉल्बी बजावण्यास प्रतिबंध केला असून तो यंदाच्या वर्षीही कायम राहणार आहे. दरम्यान, डॉल्बीला बंदी घातल्यानंतर साहजिकच पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल-ताशा पथकांना संजीवनी मिळाली तर अनेक ठिकाणी नवीन पथके देखील निर्माण झाली. सातारा शहरात सध्या भारतमाता, गंधतारा, तांडव, नादब्रम्ह, राजहंस, यवतेश्वर, संबरवाडी, सोनगाव तसेच महिलाशक्ती आदी.ढोल ताशा पथके कार्यरत आहेत. ह्या पथकांनी सातारा जिल्ह्यात आपल्या कर्तृत्वाचा ठसा तर उमटवला तर आहेच मात्र आता परजिल्ह्यात देखील या पथकांची मागणी वाढताना दिसून येते.

साहजिकच त्यामुळे सातारा शहरात नव्याने ढोल ताशा पथकांची परंपरा वाढीस लागताना दिसून येते. गणेशोत्सव आता काही दिवसांवर आल्याने ह्या पथकांच्या सरावाचा जोर वाढला आहे. बहुतांश पथके आपापल्या परिसरात तर काही यवतेश्वर, जकातवाडी परिसरात रोज सायंकाळी नित्याने सराव करताना दिसून येतात.पथकांमध्ये 50 ते 100 इतके ढोल आणि तब्बल 40 ताशे आहेत. मिरवणूक किती तास व किती ढोलताशे हवे आहेत यावर बहुतांश पथकांची मानधन रक्कम ठरविले जाते. 

मात्र, त्यापुढे जावून आता अनेक पथकांनी पुणे-मुंबई प्रमाणे ढोलताशा प्रशिक्षण देखील देत आहेत. प्रशिक्षण शिबिरात विशेषतः लहान वयोगटातील मुले आणि मुली सहभागी होत असून यंदाच्या मिरवणुकीत साताऱ्यात अनेक ठिकाणी लहान मुले ढोल ताशा पथकात सहभागी होताना दिसून येणार आहेत. त्याचबरोबर कालपर्यंत मिरवणुकांमध्ये डॉल्बीच्या डीजेवर थिरकणारी युवा पिढी आता ढोल-ताशाला देखील प्रतिसाद देत असल्याने पारंपरिक वाद्यांची संस्कृती यापुढे वाढीस लागणार आहे.

डॉल्बीला बंदी आल्यानंतर ढोल ताशा पथकांसह बॅंजोला देखील अच्छे दिन आल्याचे दिसून आले आहे. लहान मंडळांना ढोल ताशा पथके आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत. परिणामी अनेक छोटी मंडळे ही बॅंजो, सोबत छोटे ढोल आणि ताशा स्वरूपात वाजणाऱ्या थाळ्या अशा वाद्यांना पसंती देताना दिसून येतात.