आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

ग्रा.पं. निवडणुकीसाठी ४६४ उमेदवारांचा शड्डू


सातारा : जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या 48 सरपंचपदासाठी दाखल झालेल्या एकूण 136 पैकी 44 उमेदवारी अर्ज काढून घेण्यात आले. त्यामुळे 14 जण बिनविरोध झाले असून 78 उमेदवार सरपंचपदासाठी नशीब आजमावत आहेत. 382 सदस्यपदांसाठी प्राप्‍त झालेल्या 744 पैकी 218 अर्ज मागे घेतल्याने 140 जण सदस्यपदी बिनविरोध निवडून आले. तर 386 जण सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत. सरपंच निवडणुकीत 44 जणांनी तर सदस्यपदासाठी 218 अशा 262 जणांनी माघार घेतली असली तरी ग्रामपंचायत निवडणुकीत एकूण 464 जणांनी शड्डू ठोकला आहे.सरपंचपदासाठी 78 अर्ज वैध ठरले. 

तर 382 सदस्यपदासाठी दाखल झालेल्या 747 उमेदवारी अर्जांपैकी 3 उमेदवारी अर्ज बाद झाले. त्यामुळे 744 उमेदवारी अर्ज वैध ठरले. छाननीत सरपंच व सदस्यपदाच्या 884 पैकी 880 अर्ज वैध ठरले. सार्वत्रिक निवडणुकीत कराड तालुक्यातील सर्वाधिक 16 ग्रामपंचायतींचे 16 सरपंचपदासाठी आलेल्या 49 अर्जांपैकी 17 जणांनी अर्ज माघार घेतले. त्याठिकाणी 4 सरपंच व 38 सदस्य बिनविरोध निवडून आले. सरपंचपदासाठी 28 तर तर सदस्यपदासाठी 154 उमेदवार रिंगणात आहेत. तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतींमध्ये बहुरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

पाटण तालुक्यातील 6 ग्रामपंचायतींच्या 6 सरपंचपदासाठी दाखल झालेल्या 16 पैकी 3 जणांनी माघार घेतल्याने दोन सरपंच बिनविरोध झाले. याठिकाणी 11 जण सरपंचपदासाठी नशीब आजमावत आहेत. तर 44 सदस्यपदासाठी आलेले 67 पैकी 13 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 18 सदस्य बिनविरोध झाले. 36 जण सदस्यपदासाठी निवडणूक रिंगणात आहेत.

वाई तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या 7 सरपंचपदासाठी आलेल्या 31 पैकी 12 जणांनी अर्ज काढून घेतले. त्यामुळे 1 जण बिनविरोध झाला. याठिकाणी 18 जण रिंगणात आहेत. 67 सदस्यपदासाठी आलेले 214 पैकी 89 जणांनी माघार घेतली. त्यामुळे बिनविरोध 18 झाले असून त्याठिकाणी 107 जण रिंगणात आहेत. महाबळेश्‍वर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींच्या 5 सरपंचपदासाठी प्राप्‍त झालेल्या 10 पैकी 4 जणांनी अर्ज काढून घेतले. त्यामुळे 3 जण बिनविरोध झाले असून 3 जण रिंगणात आहेत. तर 35 सदस्यपदासाठी आलेल्या 31 अर्जांपैकी 9 जणांनी अर्ज काढून घेतले. त्यामुळे त्याठिकाणी 22 जण बिनविरोध झाले.

कोरेगाव तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींच्या 2 सरपंचपदासाठी आलेल्या 5 पैकी 2 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 1 जण बिनविरोध झाले असून 2 जण रिंगणात आहेत. 14 सदस्यपदासाठी प्राप्‍त झालेल्या 25 अर्जांपैकी 7 जणांनी अर्ज काढून घेतल्याने 9 जण बिनविरोध झाले असून 9 जण रिंगणात आहेत.

जावली तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीच्या 2 सरपंचदासाठी दाखल झालेला 1 अर्ज वैध ठरला होता. हा अर्ज कायम राहिल्याने संबंधित उमेदवार बिनविरोध झाला. तसेच 14 ग्रामपंचायत सदस्यपदासाठी आलेल्या 9 पैकी 4 अर्ज काढून घेतल्याने सर्वजण बिनविरोध झाले.

खटाव तालुक्यातील 9 ग्रामपंचायतींच्या 9 सरपंचदासाठी आलेल्या 23 अर्जांपैकी 6 जणांनी माघार घेतल्याने 1 जण बिनविरोध झाला. 16 जण रिंगणात राहिले. तर 75 सदस्यपदासाठी प्राप्‍त झालेल्या 137 पैकी 34 जणांनी अर्ज काढून घेतल्याने 23 जण बिनविरोध झाले. तर 80 जण रिंगणात आहेत. माघार प्रक्रियेनंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली असून संबंधित उमेदवारांना चिन्ह वाटपही करण्यात आल्याची माहिती संबंधित विभागातून देण्यात आली.