Your Own Digital Platform

होर्डींगमुळे पर्यावरणाला पोहचते बाधा


पाचगणी : 
पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असलेल्या महाबळेश्‍वर तालुक्यात नियम धाब्यावर बसवून मोठ मोठे जाहीरातीचे होर्डींग उभारण्यात आले आहेत. या होर्डींगमुळे पर्यावरणाला बाधा पोहचत आहे. महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या होर्डींगला अभय मिळत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. महाबळेश्‍वर तालुक्यात दोन नगरपालीका असून नगरपालीकेच्या हद्दीमध्ये उभारण्यात आलेले होर्डींग नगरपालीकेच्या नियमांना तिलांजली देत आहेत. पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील असणार्‍या या तालुक्यात प्रशासनाने काही नियम घालून दिले आहेत. त्या नियमांना धाब्यावर बसवून राजकीय पक्षांबरोबरच अनेक व्यवसायीक मोठ-मोठी होर्डींग उभा करत आहेत. यामध्ये वापरले जाणारे कलर पर्यावरणास मारक ठरत आहेत. तर प्रशासकीय अधिकारी तेरी भी चुप मेरी भी चुप करत सगळा कारभार उघड्यावरील डोळ्यांनी पहात आहेत.

बफर झोन, इतोसेन्सटीव्ह झोन, जंगल संवर्धन क्षेत्र, उच्च सनियंत्रण समिती फक्त कागदावरच उरल्या आहेत. महाबळेश्‍वर तालुक्यातील पर्यावरणाच्या सुरक्षितेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. होर्डींगच्या उंचीला मर्यादा असताना देखील येथे मोठ मोठे होर्डींग उभारले आहेत. पाचगणी - महाबळेश्‍वर नगरपालिका व पंचायत समिती क्षेत्रामध्ये गगनचुंबी होर्डींग उभारण्याची स्पर्धाच सुरु आहे. उच्च सनियंत्रण समितीने महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाला होर्डिंग्ज काढण्यासंदर्भात अनेक वेळा सूचना केल्या आहेत. मात्र, संबंधीत विभागाकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचे समोर आले आहे. पर्यावरणास बाधा ठरणारी बेकायदेशीर होर्डींगवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरण प्रेमींतून होत आहे.