Your Own Digital Platform

संस्थाचालक कोर्टात गेल्याने शिक्षक भरतीस विलंब : विनोद तावडे
सातारा : जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आदिवासी विभाग, समाजकल्याण विभागाच्या शाळांमध्ये शिक्षक भरती लवकरच सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलद्वारे अर्ज भरुन घेतले जात आहेत. मात्र, खाजगी शिक्षण संस्थाचालक कोर्टात गेल्याने संबंधित अनुदानित शाळांची भरती कोर्टाची सुनवणी पूर्ण झाल्यानंतरच होणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण आणि क्रीडा, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ना. विनोद तावडे म्हणाले, राज्यात पहिली ते बारावीपर्यंतचे सुमारे 2 कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शासन म्हणून आम्ही प्रशासन करत असलो तरी प्रत्यक्षात मात्र, शिक्षकच विद्यार्थ्यांना ज्ञान देण्याचे काम करत आहेत. त्यामुळे आदर्श शिक्षक पुरस्कार हे राज्यातील सर्व शिक्षकांना समर्पित आहेत. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचं व्हिडिओवरचं भाषण प्रसारित करण्यात आलं. कुठल्याही राजकीय नेत्याचं भाषण कार्यक्रमात नव्हतं. काही यशस्वी मराठी कलाकारांनी त्यांच्या शिक्षकांबद्दलचे अनुभव या अनोख्या कार्यक्रमात सांगितलं. त्यानंतर शिक्षकांचं मनसोक्‍त कौतुक करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील भावी पिढी याच शिक्षकांच्या हातून घडत आहे. त्यांचं ऋण व्यक्‍त करण्याचा आजचा दिवस आहे. राज्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांच्यावतीने प्रतिनिधीक स्वरुपात पुरस्कार देवून शिक्षकांबद्दल कृतज्ञता व्यक्‍त करण्यात आल्याचे ना. तावडे यांनी स्पष्ट केले.

भाजपचे आ. राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त वक्‍तव्यावर माफी मागितली नाही, असे विचारले असता ना. विनोद तावडे म्हणाले, हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम आहे. शिक्षक दिन असल्यामुळे आज राजकारण नको. उद्या बघू, असे सांगितले.

राज्यस्तरीय दोन पुरस्कार अचानक का नाकारण्यात आले, असे विचारले असता ना. विनोद तावडे म्हणाले, ज्या शिक्षकांना पुरस्कार द्यायचे असतात, त्यांची यादी पोलिस खात्याकडे जाते. पोलिस त्या यादीची छाननी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल आहेत का? आणखी काही तक्रारी आहेत का? याची चौकशी करुन त्याचा अहवाल पाठवतात. गृह खात्याच्या रिपोर्टप्रमाणे पुढील कार्यवाही केली जाते. जाहीर केलेल्या पुरस्कारांपैकी एक पुरस्कार स्थगित तर दुसरा पुरस्कार रद्द केला.

राज्यातील शिक्षक वेगळ्याच संक्रमणातून मार्गक्रमण करतोय. वेतन वेळेवर होत नसतानाही इतरही तक्रारी आहेत, असे विचारले असता ना. विनोद तावडे म्हणाले, ज्या शिक्षकांना केवळ कागदावरचं अनुदान दिलं होतं, ते अनुदान प्रत्यक्ष देण्याचं काम भाजप सरकारने केले. पाच लाखाच्यावर शिक्षकांची संख्या असेल तर त्यातील काही हजार शिक्षकांना अनुदान नाही. कायम विनानुदानित शाळा असल्यामुळे त्यांना अनुदान नाही. ‘कायम’ शब्द काढण्यापूर्वी गेल्या आठ वर्षांत त्या शिक्षकांना काही दिलं गेलं नव्हतं. पण गेल्या दोन-तीन वर्षांत 20 टक्क्यांचा पहिला टप्पा सुरु केला. पुढचे अनुदानही टप्प्याटप्प्याने नक्‍की देण्यात येणार आहे. संबंधित शिक्षकांची भेट झाली. ज्यांना 20 टक्के अनुदान मिळाले असेही शिक्षक आहेत. इयत्‍ता अकरावी, बारावीला शिकवणारे शिक्षकही आहेत. जुलै महिन्याचे राहिलेले अनुदान दिले आहे. संबंधित शाळांची तपासणी करुन उरलेल्यांचेही अनुदान दिले जाणार आहेत. मुख्यमंत्र्यासमवेत बसून उरलेल्या शाळांसंदर्भात एकत्रित कार्यवाही करणारा निर्णय घेतला जाणार आहे.

शिक्षक भरतीसंदर्भात विचारले असता ना. विनोद तावडे म्हणाले, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि अनुदानित शाळांची भरती प्रक्रिया सुरु करण्यासंदर्भात फॉर्म अपलोड करण्याची कार्यवाही सुरु आहे. दरम्यान काही खाजगी शिक्षणसंस्थाचालक कोर्टात गेले. त्यामुळे पुढील सुनावणी होईपर्यंत संबंधित खाजगी संस्थांमधील अनुदानित शाळांमधील शिक्षक भरती करता येणार नाही. 

बर्‍याच शिक्षणसंस्था शिक्षक भरतीमध्ये 10 लाख, 15 लाख रुपये घ्यायच्या. त्यामध्ये खर्‍याअर्थाने शिक्षकांची अडवणूक व्हायची. पवित्र पोर्टलमुळे शिक्षकांची ही अडचण दूर झाली. पण काही चुकीची कामे करणार्‍या संस्थाचालकांची संख्या वाढली. त्यामुळे ज्या अनुदानित संस्था कोर्टात गेल्या आहेत त्या वगळता जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, आदिवासी विभाग, समाजकल्याण विभागातील शिक्षक भरती पुढे कशी सुरु करता येईल याबाबत विचार सुरु आहे. त्यामुळे अनुदानित शिक्षणसंस्थांची भरती मागे रहिल मात्र उर्वरित विभागांची शिक्षक भरती सुरु राहिल.एकही पैसा न भरता शिक्षक आपली नोकरी मिळवू शकतो, हे महाराष्ट्रात घडणार आहे.

जिल्हा परिषद शिक्षक बदल्यांंदर्भात झालेल्या तक्रारींचे पुढे काय? असे विचारले असता ना. विनोद तावडे म्हणाले, ज्या तक्रारी झाल्या त्यासंदर्भात ग्रामविकास मंत्री ना. पंकजा मुंडे व त्यांचे सचिव असीम गुप्‍ता चौकशी करत आहेत. झालेल्या तक्रारी दीड टक्के आहेत. संगणकावर अर्ज भरत असताना झालेल्या चुकांमुळे त्या तक्रारी आल्या असल्याचा प्राथमिक अहवाल आहे. पंकजा मुंडे यावर योग्य निर्णय घेतील, असेही ना. तावडे यांनी सांगितले.