Your Own Digital Platform

‘तुमच्या घरी थोडी आरास तरी करा की!


‘गणपती बाप्पा मोरया...’ गणेशभक्तांनो कसा चाललाय उत्सव. मस्त ना! सकाळी, संध्याकाळी जल्लोषात अन् भक्तीभावाने होत असलेली आरती आपल्यात खरंच एक ऊर्जा निर्माण करत आहे ना. हा उत्सव म्हणजे सामाजिक प्रबोधनाचा जागरच ना. आता आपल्या सर्वांनाच देखाव्यांचे वेध लागले असतील. त्यासाठी कुणाची तारांबळ, तर धांदलही उडत असेल. देखावे साकारण्यासाठी कार्यकर्ते देहभान हरपून काम करत असतात. हा उत्सव सामाजिक पातळीवर प्रबोधनाचा जागर करत असला तरी अलिकडच्या काही वर्षांत तर राजकारणी आणि उद्योगपतींनी शिरकाव केल्यामुळे सर्वच मंडळांमध्ये प्रायोजकत्वासाठी एक प्रकारची चढाओढच लागलेली आहे. त्यातुलनेने सातारा जिल्ह्यातील उत्सव अजूनही विधायक पध्दतीने साजरा होताना दिसतोय ही आपल्यासाठी समाधानाचीच बाब आहे.

सर्वच मंडळांचे कार्यकर्ते जोषात आहेत. अमंगलाला विसरून मंगलमूर्तीच्या सेवेत तल्लीन होवून जाणारे कार्यकर्ते मोठ्या भक्तीभावाने हा उत्सव साजरा करताना दिसत आहेत. एरवी मंदिर आणि देवघरांपुरती असणार्‍या गणेशभक्तीने त्यामुळे सर्वव्यापी रूप धारण केले आहे. घरांपासून रस्त्यावरच्या मंडपापर्यंत सगळीकडेच गणपती बाप्पांचा जयघोष सुरू आहे. मंत्रोच्चारणांनी वातावरण बहरून गेले आहे. अशातच जिल्ह्यातील 48 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा माहोलही सुरु आहे. त्यामुळे साहजिकच या गावांमधील बाप्पांच्या उत्सवाला आगळेवेगळे महत्व आले आहे.

 कार्यकर्ते तर जोषात आहेत. या मंडळांना दररोज कोणीतरी प्रमुख अतिथी (यामध्ये राजकीय मंडळींचा भरणा) येवून आवर्जून भेट देवू लागला आहे. कधी नव्हे ते या मान्यवरांची गणेशभक्ती उफाळून येत असल्याचे पहायला मिळत आहे. गणेश मंडळांना या उत्सवासाठी हे मान्यवर अतिथी देणगी रुपाने भरभरुन ‘दान’ देवू लागले आहेत. मंडळांच्या मूर्तीपुढे जायचे अन नतमस्तक झाल्याचा आव आणत हळूच एक पाकीट मंडळाच्या अध्यक्षाकडे अथवा प्रमुख पदाधिकार्‍याकडे फार मोठे दातृत्व केल्यासारखे सोपवायचे. हा फंडाच आता रुढ होवू लागला आहे. मात्र खरोखरच पवित्र व निरपेक्ष भावनेतून मंडळांना ही मदत होत असेल तर त्यामध्ये वावगे काही असायचे कारण नाही. मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जर हे दान कोणी देत असेल तर ते स्वीकारायचे का? हा ज्याचा, त्याचा प्रश्‍न आहे. बाप्पांच्या समोर कोणी विकले जावू नये, एवढीच यामागची भावना आहे.

 आगामी काळातील निवडणुका व काही राजकीय आडाखे समोर ठेवून देणगी देण्याचे पीकही उदंड आले आहे, कार्यकर्त्यांनी संबंधितांचा कावेबाजपणा ओळखायला हवा. बाप्पा बुध्दीची देवता म्हणून ओळखला जातो. मग या बाप्पांसमोरच आपली बुध्दी गहाण पडायला नको. देणारे देत आहेत म्हणून घ्यायचे का? बाप्पांच्या उत्सवासाठी वर्गणी (पाकीट) देणार्‍यांची भावना खरोखरच तेवढी सात्विक असेल तर या अतिथींच्या घरातील गणेशोत्सवही तेवढ्याच श्रध्देने साजरा होत असायला हवा ना. नाहीतर उगीच एकाद्या पाटावर बाप्पांची मूर्ती बसवायची अन् नमस्कार करताना फोटो काढून तो व्हाटसअपसह सोशल मीडियावर व्हायरल करायचा अन् त्याचेही मार्केटिंग करायचे, ही प्रवृत्ती अलिकडे वाढू लागली आहे. खरोखरच गणेश भक्तीचा उमाळा फुटला असेल तर या अतिथींनी आपल्या घरीही एखादा सामाजिक प्रबोधनाचा देखावा उभारावा किंवा भक्तीभावाने एखादी आकर्षक अशी आरास तरी उभी करा. जशी सभांना गर्दी होते ना तशीच मग तुमच्या घरातील गणेशोत्सवाचा देखावा पहायलाही गर्दी होवू द्या की. तेवढीच तुमच्या वाटचालीत आणखी एकाद्या ‘सामाजिक कार्याची’ भर पडेल ना. मंडळांना भेटी देवून ‘सत्कार्य’ करणारे असे किती अतिथी आहेत, बघा बरं. बाप्पा.., बाप्पा.., सुबुध्दी द्या हो जरा!