जिल्हाधिकारी निवासस्थान परिसरात चंदनचोरी


सातारा : शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असतानाच थेट सातारा जिल्हाधिकारी निवासस्थानाच्या परिसरात तब्बल १० ते १२ चंदनाची झाडेच तोडून नेली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सैनिक स्कूल परिसरातही गेल्या काही दिवसांपूर्वी चंदनाची झाडे चोरीला गेली असून वारंवार घडणार्‍या या घटनांमुळे हे दोन्ही परिसर कितपत सुरक्षित आहेत? असा सवाल उपस्थित झाला आहे.

सर्कल अधिकारी शिवाजी पिसाळ यांनी याबाबतची माहिती शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा- कोरेगाव रस्त्यावरील जिल्हा न्यायालयाच्या समोरच जिल्हाधिकारी यांचे निवासस्थान आहे. या परिसरात दि. ३ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी १० हजार रुपये किंमतीची १० ते १२ चंदनाची झाडे कापून नेली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर खळबळ उडाली. याबाबत महसूल विभागाला सांगितल्यानंतर सर्कल अधिकार्‍यांनी पाहणी करुन पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा करुन अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला. चंदनाची चोरीला गेलेली झाडे ३ फूट उंचीचे असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी निवासस्थान व सैनिक स्कूल परिसरात चोरटे बिनधोकपणे चंदनाची झाडे कापून नेत असल्याने सुरक्षितेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

No comments

Powered by Blogger.