निसराळेत १४ जणांना अन्नातून विषबाधा


सातारा : धार्मिक विधींसाठी बनवलेले जेवण खाल्ल्यानंतर मंगळवारी दुपारी निसराळे (ता.सातारा) येथील चौदा जणांना पोटदुखी, उलट्यांचा त्रास होवू लागला. त्या चौदा जणांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, अन्नातूनच विषबाधा झाल्याचा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.याबाबत प्राथमिक माहिती अशी, निसराळे येथे मंगळवारी सकाळी एका कुटुंबात धार्मिक विधींचे आयोजन करण्यात आले होते. या विधीसाठी येणार्‍या नातेवाईकांसाठी एकत्रित स्वयंपाक करण्यात आला होता. जेवण तयार झाल्यानंतर दुपार नंतर जेवणाच्या पंगती बसण्यास सुरुवात झाली. जेवण झाल्यानंतर काही वेळाने मात्र एक-दोघांना पोटदुखी व उलट्यांचा त्रास सुरु झाला. पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होणार्‍यांच्या संख्येत वाढ होवू लागल्याने गावात खळबळ उडाली.

कार्यक्रमासाठी आलेल्यांनी जेवण खाल्ल्यानंतर उलट्या व जुलाबाचा त्रास थांबत नसल्याने प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तरीही प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्याने अखेर त्या सर्वांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रेखा घोरपडे, स्वप्नाली घोलप, सुप्रिया गायकवाड, लिलावती गायकवाड, सुरेखा गायकवाड, अमृता गायकवाड, तृप्ती गायकवाड, रुपाली गायकवाड, रेखा गायकवाड, उज्वला गायकवाड, लिलाबाई भोसले रसिका गायकवाड, मनीषा घोरपडे, रंजना रणदिवे या चौदाजणांवर उपचार सुरु आहेत. या सर्वाना अन्नातून विषबाधा झाली असूनए त्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बोरगाव पोलिसांच्या पथकाने निसराळे येथे भेट देत अन्नाचे नमुने जप्त करण्याची कार्यवाही केली.

No comments

Powered by Blogger.