माण-खटावमध्ये आज जयकुमार गोरेंचे शक्तीप्रदर्शन


खटाव : राष्ट्रीय कॉंग्रेसची जनसंघर्ष यात्रा आज माण आणि खटाव तालुक्‍यात येत असल्याने दोन्ही तालुक्‍यात यात्रेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. यामुळे कार्यकर्ते चार्ज झाले आहेत. वडूज आणि दहीवडीत होणाऱ्या यात्रेच्या स्वागताची तसेच म्हसवड येथील जाहीर सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली असून आ. जयकुमार गोरे जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी शक्तीप्रदर्शन करणार असल्याने उत्कंठा वाढली आहे.

भाजपा सरकारच्या निष्क्रिय कारभाराविरोधात महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसने सुरू केलेली जनसंघर्ष यात्रा आज जिल्ह्यातील माण आणि खटाव तालुक्‍यात येत आहे. नऊ वर्षांपासून माण-खटाव मतदारसंघावर कॉंग्रेसच्या आ. जयकुमार गोरेंचे पूर्ण वर्चस्व आहे. दोन्ही तालुक्‍यांच्या जिव्हाळ्याच्या पाणीप्रश्नावर तर आ. गोरेंनी सातत्याने प्रयत्न केला आहे. त्यांच्या पाठपुराव्याने पाणीयोजनांची अनेक कामे मार्गी लागली आहेत. दोन्ही तालुक्‍यांत कोट्यवधींचा निधी खर्चून शेकडो सिमेंट बंधारे, गावोगावी रस्त्यांचे जाळे, वीज, पाणी यासारख्या गरजा वाड्यावस्त्यांपर्यंत पोहचविण्यात आ. गोरेंना यश आले. उरमोडी उपसा सिंचन योजना पूर्णत्वाकडे नेण्यात आ. गोरेंचा खूप मोठा वाटा आहे.

दरम्यान, गेल्या साडेतीन वर्षांत राज्यात तसेच केंद्रात सत्तेत असलेले भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर निष्क्रिय ठरले आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसने राज्यभर जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे. ही यात्रा आज आ. जयकुमार गोरेंच्या मतदारसंघात येत आहे. जीवघेणी महागाई थांबली पाहिजे, घोटाळे नको, सुशासन हवे आहे. 

म्हणूनच पुन्हा कॉंग्रेसचेच सरकार पाहिजे अशा टॅगलाईन घेऊन पक्षाचे सर्व वरिष्ठ जागृती करायला निघाले आहेत. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर माण आणि खटावमध्ये येणारी संघर्षयात्रा कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना चांगलीच चार्ज करणार आहे. गावोगावच्या कार्यकर्ते आणि जनतेच्या कटाक्षाने संपर्कात रहाणाऱ्या आ. गोरेंनी आजच्या यात्रेवरही चांगलेच लक्ष ठेवले आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याने विधानसभेला आ. गोरेंना भाजपाकडूनच आव्हान मिळणार आहे. त्यामुळे आजच्या म्हसवड येथील सभेकडे दोन्ही तालुक्‍यांसह जिल्ह्याचे आणि भाजपाचेही लक्ष लागले आहे.

आज माण आणि खटाव तालुक्‍यात येणाऱ्या जनसंघर्ष यात्रेत कॉंग्रेसचे दिग्गज मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात सर्वांनी भाजपा सरकारचे वाभाडे काढले आहे. आज म्हसवड येथील सभेत प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे आणि स्वतः जयकुमार गोरे यांच्या तोफा भाजपा सरकारच्या विरोधात धडाडणार आहेत. कॉंग्रेसच्या सर्वच वरिष्ठांना आक्रमक व्हावेच लागणार आहे. तरच कार्यकर्तेही चार्ज होणार आहेत.

No comments

Powered by Blogger.