Your Own Digital Platform

खा. उदयनराजेंची ना. बापट यांना सातार्‍यातून लोकसभा लढवण्याची ऑफर


सातारा : खा. उदयनराजे भोसले या कार्यक्रमाला आहेत हे समजल्यामुळेच मी पुणे येथील कार्यक्रम सोडून सातार्‍याच्या कार्यक्रमाला आलो आहे. व्यासपीठावर उदयनमहाराजांबरोबर बसायला भाग्य लागते. उदयनराजे सोबत असले की आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांला वेगळाच उत्साह येतो, अशा राजकीय कोट्या करत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना. गिरीष बापट यांनी सातार्‍यात वातावरण हलके केले. 

याच वातावरणात उदयनराजेंनी बापट यांना सातार्‍यातून लोकसभा लढवण्याची ऑफर दिली.सातारा हेड पोस्ट ऑफीसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेचा लोकार्पण सोहळा ना.गिरीष बापट यांच्या हस्ते व खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, डाक घर प्रवर अधीक्षक ए.डी. टेकाळे, जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, राहूल थित्रे, एन.डी. पाटील उपस्थित होते.

खा.उदयनराजे भोसले म्हणाले, बापट साहेब बस्स झाला महाराष्ट्र तुम्ही आता दिल्लीत या म्हणजे तुमचा जास्त वेळ आम्हाला सहवास लाभेल.तुमची इच्छा असेल तर सातार्‍यातून उभे रहा. बापट साहेबांच्या येण्यामुळे मन प्रफुल्लीत होते. एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो.

दरम्यान, पोस्ट विभागाची स्थापना 1766 मध्ये झाली आहे. पोस्ट विभागावर नागरिकांची आपुलकी आणि विश्‍वास हा नेहमीच राहणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सेवा सुरु केल्यामुळे पोस्ट विभागाला पुनर्जीवन मिळणार आहे. यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या खातेदारांना विमाही उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे सर्व सोयी पोस्ट ऑफीसच्या एका छत्राखाली मिळणार असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.या कार्यक्रमास पोस्ट विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.