आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

राष्ट्रीय पेयजलच्या कामांना गती मिळणार


मसूर : राष्ट्रीय ग्रामिण पेयजल योजनेअंतर्गत समाविष्ट गावांमधील कामांना निधी उपलब्ध करणे, तसेच उर्वरीत गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत समावेश करणेसाठी मसूर, उंब्रज, पाल, गोवारे या निमशहरी गावांमध्ये माणसी दरडोई 40 लिटर ऐवजी दरडोई माणसी 70 लिटर पाणी मिळावे, अशी झालेली मागणी या विषयांवर विधानभवनात विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या दालनात मंगळवारी महत्वपूर्ण बैठक झाली.

बैठकीस आ. बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र शासनाचे अतिरिक्‍त मुख्य सचिव शामलाल गोयल, राज्याचे स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांचे खाजगी सचिव बप्पासाहेब थोरात तसेच जि.प.सदस्य मानसिंगराव जगदाळे, जि.प.सदस्या विनिता पलंगे, पाल देवस्थानचे विश्‍वस्थ संजय काळभोर, संग्रामसिंह पलंगे, प्रताप चव्हाण तसेच सुभाष भुजबळ मुख्य अभियंता म.जि.प्रा. पुणे, सु.ना.गरंडे अधीक्षक अभियंता म.जि.प्रा. मुंबई, एस.एस.शिंदे कार्यकारी अभियंता ग्रामिण पा.पु. जि.प.सातारा, एन.बी.भोई कार्यकारी अभियंता म.जि.प्रा.कराड, एस.जे.आडके उपअभियंता ग्रामिण पा.पु.हेही उपस्थित होते.

आ. बाळासाहेब पाटील यांनी कराड उत्‍तर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रीय पेयजलमध्ये समाविष्ट गावातील कामांना निधीची तरतूद करूण कामे पूर्ण करण्याबत सूचना मांडली. तसेच उर्वरीत गावांचा राष्ट्रीय ग्रामिण पेयजल मध्ये समावेश करणे. मसूर, उंब्रज, गोवारे, ही गांवे निमशहरी असून या गावामध्ये बाहेरून मोठ्या प्रमाणावरती लोक येत असतात तर पाल येथे श्री खंडोबा देवस्थान आहे. येथे दर्शनासाठी पोर्णिमा व अमावस्या दिवशी तसेच प्रत्येक रविवारी व दरवर्षी यात्रे निमीत्त सुमारे चार लाख ते पाच लाख भावीक जमतात. त्यामुळे या गावांमध्ये 70 लिटर पाणी दरडोई मिळावे अशी मागणी आ. पाटील यांनी केली. परंतु गोयल यांनी शासन निर्णया नुसार अशा गावांकरीता 40 लिटर ऐवजी 55 लिटर प्रमाणे दरडोई पाणी देण्यास तत्वत: मान्य केले. 70 लिटर पाणी मिळावे याबाबतचा अहवाल शासनाकडे सादर करून त्यास खासबाब म्हणून परवानगी मिळू शकते असे सुचित केले.

या योजनेमध्ये समाविष्ट गावातील कामांना निधीची तरतूद करणेबाबत पाठपुरावा केला जाईल व उर्वरीत गावांनाही समाविष्ट करणेबाबत उचीत कार्यवाही करणेत येईल, असे सांगितले. कराड उत्तरमधील उर्वरीत गावांचाही राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेत समावेश होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.