दौड राजधानीची ...


जागतिक दर्जाच्या किर्तीमान सोहळ्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून सातारकरांसह देश विदेशातील स्पर्धक पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफमॅरेथॉन स्पर्धेसाठी राजधानीत दाखल झाले होते. या सर्वांनीच रविवारी पहाटे 4 पासूनच तालीम संघ मैदानावर तोबा गर्दी केली होती. स्पर्धेत जणू काही आख्खा साताराच दौडल्याचे वातावरण पहायला मिळाले. त्यामुळे अवघ्या सातार्‍याचे वातावरण मॅरेथॉनमय झाले होते. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश, विश्‍वास नांगरे - पाटील, जिल्हा पोलिस प्रमुख पंकज देशमुख, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे आदी मान्यवरांनी स्पर्धेदरम्यान सहभाग नोंदवला. या स्पर्धेने सातारच्या लौकिकाचा झेंडा पुन्हा एकदा अटकेपार फडकावला. 

सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेत तब्बल 8 हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. यामध्ये आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धकही होते. स्पर्धेचे हे सातवे वर्ष असल्याने जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व मान्यवरांना सहभागी होण्याची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार मान्यवरांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश,सीईओ कैलास शिंदे, एलसीबीचे पोनि पद्माकर घनवट, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर या स्पर्धेत धावले. त्याचबरोबर अपंग व वृध्दांनीही या स्पर्धेचा आनंद लुटला. देश-विदेशातील स्पर्धक धावत असताना या मान्यवरांची धावही नजरेत भरत होती.

शंभरहून अधिक पोलिसांचा सहभाग..

रविवारी झालेल्या हाफ हिलमॅरेथॉन स्पर्धेत महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ पोलिसांसह बहुतांशी पोलिस कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील, औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, पोनि पद्माकर घनवट व राज्यभरातील शंभरहून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.

सैनिक स्कूल सातारा येथील 1988 साली एकाच वर्गातून पासआऊट झालेल्या सुमारे 60 विद्यार्थ्यांनी सातारा हाफ हिल मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला. भारतातील ही पहिलीच वेळ असेल की एकाच वर्गातील इतक्या विद्यार्थ्यांनी एखाद्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. हा जणू वेगळाच विक्रम म्हणावा लागेल. यातील 16 जण एनडीए मध्ये कार्यरत असून काहीजण प्रशासकीय सेवेत तर काही परदेशात आहेत.

सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या सातव्या पर्वात स्पर्धकांनी उत्सपूर्त सहभाग घेतला होता. यामध्ये काही हौशी स्पर्धकांनी भारताचा राष्ट्रध्वज असलेला तिरंगा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असणारा भगवा ध्वज घेवून धावपट्टूंनी ही मॅरेथॉन पूर्ण केली. हे स्पर्धक या स्पर्धेचे आकर्षण ठरले.

सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा सुरू झाल्यानंतर सातारकरांमध्ये हळूहळू धावण्याबाबत जनजागृती झाली आहे. त्याचा प्रत्येक वर्षी अनुभव आला असून धावणारांची संख्या ही आता दोन हजारावरून सात हजार झाली आहे. यामध्ये फक्त सामान्य नागरिकच धावत नसून अपंग व वृध्दही या स्पर्धेचा आनंद लुटत आहे. अगदी 70 ते 90 वर्ष असणार्‍या वृध्दांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्याचबरोबर अपंगासाठीही विविध बक्षीसे असल्याने अपंग व्यक्तिंनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. आगामी कालावधीत यामध्ये आणखी वाढ होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मॅरेथॉन मार्गावर तालीम संघ ते बोगदा परिसरा पर्यंत सातारकरांनी ठिकठिकाणी आकर्षक रांगोळ्या रेखाटल्या होत्या. यातून धावपट्टूंना प्रोत्साहन व उत्साह येण्यासारख्या रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. तर शहरातील विविध मंडळे, सामाजिक संस्था व मॅरेथॉन ग्रुपकडून शहरातील ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आली होती.
सातार्‍यात सुरू झालेल्या या स्पर्धेने अल्पावधीतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. स्पर्धेतील सहभागाची गिनीज बुकमध्येही नोंद झाली आहे.

गेल्या सहा वर्षांपासून पीएनबी मेटलाईफ सातारा हिल हाफ मॅरेथॉन चांगल्या रितीने पार पडत असल्याबद्दल खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आवर्जुन उपस्थित राहून संयोजकांचे कौतुक केले. स्पर्धेसाठी वातावरण चांगले असल्याने स्पर्धक मनापासून सहभाग घेत आहेत.सातार्‍याची मॅरेथॉन सातासमुद्रापार गेल्याने सातार्‍याच्या पर्यटन व्यवसायामध्ये वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
वर्षागणीक स्पर्धा उत्तमोत्तम होत असल्याने भविष्यात ही स्पर्धा उल्लेखनीय होईल, असा विश्‍वास खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केला.सध्या ज्या मार्गावर ही स्पर्धा होते त्या जागी भविष्यात 

राजमार्ग झाल्यास उताराने येणार्‍या सर्व स्पर्धकांना याचा अधिक फायदा होईल. सातारा सारख्या शहरात आतंरराष्ट्रीय स्पर्धक येतात ही शहरासाठी चांगली बाब असल्याचे दोन्ही राजेंनी सांगितले.
पीएनबी मेटलाईफ हिल हाफ मॅरेथॉन स्पर्धा उदंड उत्साहात पार पडत असताना पाऊस व धुक्याने स्पर्धकांचा उत्साह आणखी वाढवला. स्पर्धा सुरू झाल्यानंतर ढगाळ वातावरणाबरोबरच रिमझिम पावसाच्या सरी कोसळत होत्या. त्यामुळे उपस्थित स्पर्धकांसह मान्यवरांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळी 6 वाजता सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धेला प्रारंभ झाला. यावेळी सर्व वातावरण भारावलेले होते. प्रत्येक स्पर्धक जोशाने या स्पर्धेत सहभागी होवून धावत होता. तालिम संघ मैदान ते प्रकृती रिसॉर्ट पर्यंत प्रत्येक 100 ते 200 मीटर अंतरावर स्पर्धकांसाठी पाण्याची सोय केली होती. तसेच स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिक टाळ्या वाजवत होते. काही ठिकाणी तर स्पर्धकांवर पाण्याचा फवारा मारून त्यांच्यामध्ये आणखी उत्साह निर्माण केला जात होता. प्रत्येक मुख्य चौकामध्ये ढोल-ताशाचा गजर ऐकू येत होता. जणू काही सण उत्सव साजरा होत असल्याचे वातावरण या स्पर्धेत पहायला मिळाले. डॉल्बीवर बंदी आसल्याने सर्वत्र पारंपारिक वाद्ये वाजवण्यात आली. स्पर्धेच्या शेवटीही उत्साहपूर्ण वातावरणात अनेक स्पर्धक फोटोसेशन करून आनंद लुटताना दिसले.

खिंडवाडी येथील स्वप्निल सावंत यांची मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची ही चौथी वेळ ठरली. ते पुणे येथील सणस मैदानावर दररोज 20 ते 25 किलोमीटर धावण्याचा सराव करतात. या स्पर्धेत त्यांनी 1 तास 17 मिनिटे 19 सेकंदात 21 कि.मी. अंतर पार करत भारतीय पुरूषांमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. त्यांचे ‘पुढारी’चे वृत्त संपादक व जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे यांनी सन्मानचिन्ह देवून गौरव केला.

यंदा ग्रेड सेप्रेटरच्या कामामुळे स्पर्धेचा शुभारंभ आणि समारोप तालीम संघ मैदानावर घेण्यात आला. पोलिस करमणूक केंद्र व ‘पुढारी’ भवनच्या परिसरातच स्पर्धेची जोरदार तयारी सुरू होती. शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत ‘पुढारी’ भवन मॅरेथॉनच्या माहोलात न्हावून गेले होते.

पीएनबी मेटलाईफ हिल हाफ मॅरेथॉनमध्ये ‘पुढारी’चा कृतीयुक्त सहभाग लाभला. विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, वृत्त संपादक हरीष पाटणे, जाहिरात व्यवस्थापक नितिन निकम यांचा या स्पर्धेत सहभाग राहिला. हरीष पाटणे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांचा गौरवही करण्यात आला. त्याचबरोबर नितीन निकम, विठ्ठल हेंद्रे, बाळू मोरे, सोमनाथ राऊत, सादिक सय्यद, या ‘पुढारी’च्या प्रतिनिधींनी 21 कि.मी. ची मॅरेथॉन पूर्ण केली. याशिवाय पांडुरंग पवार, सचिन जाधव हे पत्रकारही या स्पर्धेत धावले.

No comments

Powered by Blogger.