भरत फडतरे व टोळीवर ‘मोका’


फलटण : फलटण शहर व तालुक्यात दरोडा, चोरी, जबरी चोरी अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया करून उच्छाद मांडणार्‍या भरत फडतरे व त्याच्या टोळीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये (मोका) अंतर्गत कारवाई करण्यास मंजुरी दिली असल्याची माहिती, फलटण शहर पोलिस ठाण्याचे पो.नि. प्रकाश सावंत यांनी दिली.पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मोका’न्वये कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. 

फलटण पोलिस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी भरत फडतरे टोळीवर ‘मोका’ लावण्याबाबतचा अहवाल पोलिस अधीक्षक सातारा यांच्याकडे पाठवला होता. त्यानुसार कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी याबाबतच्या प्रस्तावास मान्यता दिली. त्यानुसार मंगळवारी भरत लक्ष्मण फडतरे (रा. मलठण, ता. फलटण), विजय दत्तू ननवरे (रा. आखरी रस्ता, वडर गल्ली, मंगळवार पेठ, फलटण), स्वप्निल गुलाब जावळे (रा. बोरी, ता. खंडाळा) यांच्यावर ‘मोका’न्वये कारवाई करण्यात आली.

भरत फडतरे याच्यावर फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत तर विजय दत्तू ननावरे याच्यावर फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल आहेत. स्वप्निल गुलाब जावळे याच्यावर फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरी, चोरी, घरफोडी, असे पाच गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील फडतरे व ननावरे हे वेगवेगळ्या गुन्ह्यात सातारा येथील कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत तर स्वप्नील जावळे हा नुकताच जामिनावर सुटला असल्याची माहिती पो.नि. सावंत यांनी दिली. भरत फडतरे टोळीवर फलटण शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यात एकूण 15 गुन्हे दाखल आहेत.

No comments

Powered by Blogger.