Your Own Digital Platform

भांबवली पठारावरही फुलांची उधळण


परळी : सध्या कासवर फुललेल्या फुलांचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असतानाच भांबवली वजराई धबधब्यामुळे अल्पावधीतच प्रसिद्धीस आलेल्या भांबवली पठारावरही निसर्गाने पुष्प सौंदर्याची उधळण केली आहे. विशेष म्हणजे निसर्गाचा हा खजिना पर्यटकांना विनाशुल्क लुटता येत आहे. कास पठारावर अत्यंत दुर्मिळ अशा फुलांच्या जाती आहेत, हे आपल्या डोळ्यात सामावून घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र भांबवली पठारावरही अशाच प्रकारची फुले आढळून येत आहेत. 

सध्या येथील विविधरंगी फुलांचा मोसम बहरत असून या परिसरात कवला, सोनकी, सोंटिकली, करडू, लाल गोंधणी, निळवंती, एकदांडी यांसह पिवळी सोनकी, सीतेचे असावं, रानहळद, कापरु, इंफिजिनिया इंडिका, डीपकाडी, स्पद, रानमोहरी, वायतुरा, आयोलिया, रानगवारी, जांभळा, तेरज पांढरी, अशा अनेक प्रकारची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. निसर्गरम्य भांबवली वजराई धबधबा दाट धुके, खळखळत वाहणारे पाणी विविध प्रकारचे पक्षी, वन्यजीव यामुळे येथे आलेले पर्यटकही निसर्गाशी एकरूप होताना दिसत आहेत. दरम्यान याबाबत माहिती असलेले पर्यटक या ठिकाणी आवर्जून भेट देत आहेत. बहुतेक पर्यटकांना या ठिकाणाबाबाबत माहिती नसल्यामुळे अनेकदा त्यांची दिशाभूल केली जात आहे. याबाबत अनेक पर्यटकांनी तक्रारही केल्या आहेत. निसर्गाने मात्र या पठाराला भरभरून दिले आहे. त्यामुळे हे पुष्पपठार रंगीबेरंगी फुलांनी बहरून गेले आहे.