आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क...

कराड-रत्नागिरी राज्यमार्ग किती बळी घेणार


येळगाव : कराड - रत्नागिरी (चांदोली)राज्यमार्गाची टाळगांव, येळापूरसह शेडगेवाडी दरम्यान जीवघेण्या चरींमुळे व खड्डयांनी कोकरुडच्या युवकाचा बळी घेतल्याने जनतेत संतापाची लाट उसळली आहे. वारंवार मागणी करूनही बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कोकणला जोडणार्‍या या रस्त्याचे रूंदीकरणासह चौपदरीकरण होणार असल्याची चर्चा अनेक वर्षे सुरू आहे. मात्र बांधकाम खात्याच्या धोरणांमुळे सध्या या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असून अपघातांची मालिका सुरू आहे. यात वाहनधारकांचे हाल होत आहेत. प्रवाशांचे बळीही जात आहेत. दोन दिवसापूर्वी कोकरुडच्या एका तरूणाचा येळापूरजवळ चव्हाणवाडी - जामदारवाडी दरम्यान मोटारसायकलचे पुढील चाक खड्ड्यात अडकल्याने अपघात होऊन तो जागीच ठार झाला. कराड तालुक्यातील टाळगावजवळ तर या मार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. येथे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता ? तेच कळत नाही.

येणपेजवळील मेणी घाटातून पुढे कोकण दर्शनापूर्वीच सय्यदवाडी, येळापूर, शेडगेवाडी दरम्यान विस्तीर्ण, खोल खड्डे व चरी आहेत. त्यामुळेच चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे चालकांना विशेषत: मोटारसायकल चालकांना जीव गमवावे लागत आहेत. त्यामुळे बांधकाम विभाग अजून किती बळी गेल्यावर जागा होणार? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.

कराड-चांदोली हा मार्ग कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र यांना जोडणारा सर्वात जवळचा मार्ग आहे. यापूर्वी कराड दक्षिणचे प्रतिनिधीत्व माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर हे करत होते. मात्र 2014 पासून माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण हे प्रतिनिधीत्व करीत आहेत. या मार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी आ. चव्हाण यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला आहे. मात्र त्यानंतरही जर आपल्या भागातील व्यक्‍ती प्रतिनिधीत्व करत नसतील तर कशी अवस्था होते, याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे.