Your Own Digital Platform

लोकप्रतिनिधींशी संघर्ष नाही पण डॉल्बीला विरोधच


सातारा : सातार्‍यातील गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूकीबाबत पोलिसांचा लोकप्रतिनिधींशी संघर्ष नाही मात्र त्यासाठी वापरल्या जाणार्‍या इलेमेंटला (डॉल्बी) आमचा विरोध कायम आहेे. पोलिसांचा हेतू प्रामाणिक व स्पष्ट आहेे. आमची कोणतीही पक्षपातीपणाची व पूर्वग्रह दूषीताची भावना नाही. पोलिसांना राजकारणात रस नाही. डॉल्बीबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी असून आम्ही जो निर्णय होईल त्याची वाट पाहतोय. जे कायदेशीर आहे तेच होईल, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले.

दरम्यान, सातारच्या शांततेसाठी सुरू असलेल्या कारवायांमध्ये सातत्य राहिल. कोणाचाही दबाव आम्ही घेणार नाही. आमचा मणका ताठ आहे, असेही नांगरे-पाटील म्हणाले.पोलिस करमणूक केंद्रात झालेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने, राजलक्ष्मी शिवणकर, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी शंकर गोरे उपस्थित होते.

विश्‍वास नांगरे-पाटील पुढे म्हणाले, गणेशोत्सवाचे सर्वांना आकर्षण आहेे. अशा उत्सवामध्ये डॉल्बी ऐवजी चौकाचौकात, मंडळापुढे सीसीटीव्ही बसवाली जावीत. अशी रचनात्मक कामे, देखावे होणे क्रमप्राप्‍त आहेे. डॉल्बीचे अनेक दुष्परिणाम आहेत. सातारा शहरासह अनेक जिल्ह्यात डॉल्बीचे बळी गेले आहेत. सातार्‍यात यंदा कमीतकमी पोलिस बंदोबस्तात गणेशोत्सव व्हावा, अशी पोलिस दलाची प्रामाणिक इच्छ आहेे. विसर्जनाबाबत पोलिसांची सर्व रणनिती ठरलेली आहेे. विसर्जनावेळी कोणताही तणाव राहणार नाही. आम्ही लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्यांशी चांगला संवाद साधत आहे, असेही ते म्हणाले.

पोलिस अधीक्षक पंकज देशमुख म्हणाले, सातारा पोलिसांवर कारवाईबाबत कोणाचाही दबाव नाही. गणेश विसर्जनापूर्वी तात्पुरत्या तडीपारी कारवाई जोमाने सुरु असून मंगळवार अखेर एकूण 45 जणांना तडीपार करण्यात आले आहेे. अद्याप त्याबाबतची सुनावणी पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांच्याकडे सुरुच आहे. सातार्‍यातील वाहतुकीचा प्रश्‍न लवकर निकालीत काढला जाईल व सर्वांचा प्रवास सुखकर राहिल, अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान, मुख्याधिकारी शंकर गोरे यांनीही कृत्रिम तळ्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगून पालिका सज्ज असल्याचे सांगितले.

दरम्यान, सुरुवातीला हरीष पाटणे, नरेंद्र पाटील, प्रकाश गवळी, शरद काटकर, अविनाश कदम, श्रीकांत शेटे, आयेशा पटणी, सिध्दी पवार, विजय काटवटे, श्रीकांत आंबेकर यांनी आपली मनोगते व्यक्‍त केली. यामध्ये प्रामुख्याने पोलिस दलाकडून गुंडावर कारवाईत सातत्य रहावे. पोलिसांवर कोणत्याही नेत्याचा दबाव नसावा. गणेश विसर्जनासाठी कायमस्वरुपी तळे केले जावे. सातार्‍यातील सर्वच अतिक्रमण काढली जावीत. गणेशोत्सव कालावधीत शेवटची दोन दिवस दारुविक्री बंदी करावी. वाहतुक विभागाकडून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात असून तो कमी करावा, अशा अनेक सूचना करण्यात आल्या. यावेळी सातार्‍यातील प्रतिष्ठित नागरिक, महिला, गणेश मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होेते.