Your Own Digital Platform

इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक देशाच्या अर्थ व्यवस्थेत नवी क्रांती घडवेल


सातारा : पोस्ट खात्यावर आजही लोकांचा मोठा विश्वास आहे. त्यांचे कार्यक्षेत्रही मोठे आहे. पोस्ट विभागामार्फत नव्याने सुरु करण्यात आलेल्या इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक ही योजना देशाच्या अर्थ व्यवस्थेत नवी क्रांती घडवेल असा विश्वास अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

सातारा हेड पोस्ट ऑफीसमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंकेचे लोकार्पण नामदार बापट यांच्या हस्ते व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले , त्याच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, डाक घर प्रवर अधीक्षक ए.डी. टेकाळे, जिल्हा परिषद सदस्य दिपक पवार, विक्रम पावसकर, राहूल थित्रे, एन.डी. पाटील आदी उपस्थित होते.

केंद्र व राज्य शासनाच्या योजना सातारा जिल्ह्यात चांगल्या राबविल्या जात असल्याचे सांगून गिरीष बापट पुढे म्हणाले, आज येथील इंडियन पोस्ट पेमेंट बॅंक शाखेला भेट दिली. ही शाख अत्याधुनिक तयार करण्यात आली आहे. या सुविधेमुळे बॅंकींग क्षेत्र सर्वसामान्यांसाठी खुले झाले आहे. ही सेवा सुरु करुन केंद्र शासनाने क्रांतिकारी पाऊल टाकुन एक एतिहासिक निर्णय घेतला आहे. पोस्ट विभागातील कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षण द्या. तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक खाती उघडावी, असे आवाहनही बापट यांनी यावेळी केले.

पोस्ट विभागाची स्थापना सन 1766 मध्ये झाली आहे. पोस्ट विभागावर नागरिकांची आपुलकी आणि विश्वास हा नेहमीच राहणार आहे. इंडिया पोस्ट पेमेंट्‌स बॅंक सेवा सुरु केल्यामुळे पोस्ट विभागाला पुनर्जीवन मिळणार आहे. यातून अनेकानां रोजगार उपलब्ध होणार आहे. इंडियन पोस्ट पेमेंट बॅंकेच्या खातेदारांना विमाही उपलब्ध होणार आहे. या सुविधेमुळे सर्व सोयी पोस्ट ऑफीसच्या एका छत्राखाली मिळणार आहेत. या उपक्रमासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास पोस्ट विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.