Your Own Digital Platform

ग्रामीण भागातही स्वाईनसद‍ृश आजारांचा फैलाव


सातारा : 
सातारा जिल्ह्यात सातारा शहर तसेच अनेक गावांमध्ये डेंग्यू, स्वाईन फ्लू सद‍ृश आजाराने थैमान घातले असून यावर तातडीची उपाययोजना म्हणून नागरिकांसाठी मास्कची उपलब्धता करण्याबरोबरच प्रत्येक ग्रामपंचायतीने फॉगिंग मशिनने गाव परिसराची धुरळणी करण्याची मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे. यावर्षी वातावरणातील बदलामुळे सर्वत्र दुषित वातावरण असून गाव परिसरामध्येही अनेक गावांमधून सांडपाण्याची डबकी, तुंबलेली गटारे, अस्वच्छतेचे प्रमाण वाढल्याचे चित्र नेहमी दिसून येते. यातच विविध जातींच्या डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे आढळून येते.

याला प्रतिबंध करण्यासाठी गावपातळीवर फारशा उपाययोजना केल्या जात नाहीत. अस्वच्छ पाणी, अस्वच्छ गटारे, अस्वच्छ गाव परिसर विविध रोगांना त्यामुळेच निमंत्रण देत आहे. ग्रामीण भागातही मध्यंतरी तसेच आताही साथीच्या आजारांचे अनेक रूग्ण असून गावोगावी दवाखाने रूग्णांनी भरून गेले आहेत. सातारा शहराचीही वेगळी अवस्था नाही. शासकीय रूग्णालयाबरोबरच खासगी रूग्णालयेही स्वाईन तसेच अन्य आजारांच्या रूग्णांनी भरून वाहत आहेत.

अस्वच्छ गाव परिसराची स्वच्छता करण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर तातडीने उपाययोजना करायला हव्यात. मात्र, याकडे कोणतीही ग्रामपंचायत लक्ष देत असल्याचे दिसून येत नाही. ग्रामपंचायतीला फॉगिंग मशिन नसेल तर इतर ठिकाणी कोठे उपलब्ध होईल त्या ठिकाणाहून फॉगिंग मशिन मागवून संपूर्ण गाव परिसराची धुरळणी करण्याची मागणी आता पुढे येत आहे.

ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक तसेच सर्व सदस्यांनी आपापले गाव साथीच्या रोगापासून दूर कसे राहिल याकडे कटाक्षाने लक्ष पुरवले पाहिजे. जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायत विभाग तसेच आरोग्य विभागाने तातडीने याद‍ृष्टीने पावले उचलून स्वच्छ गाव मोहीम जातीने हाती घेण्याची मागणी होत आहे.

गावाचा परिसर, गाव पाणवठे, पाणीपुरवठा योजनेचे ठिकाण, सार्वजनिक विहिरी, रस्ते, गटारांची तातडीने स्वच्छता मोहीम हाती घ्यावी यासाठी ग्रामस्थांचेही सहकार्य घेण्यास हरकत नाही. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणेच नष्ट झाली तर आरोग्य विभागाचे पन्‍नास टक्के काम हलके होईल.

सातारा जिल्ह्यात स्वच्छतेच्याबाबतीत देशात पहिला असून स्वच्छ ग्राम अभियान मोहीम या जिल्ह्याने लिलया पेलली आहे. या मोहिमेतून गेल्या दहा ते पंधरा वर्षात अनेक गावे ग्रामपंचायतींनी सहभाग घेवून आपले गाव आदर्श बनवले आहे. आता स्वच्छतेमध्ये सातत्य राखण्याची गरज आहे. असे केले तरच साथींच्या रोगांपासून गावे मुक्‍त होतील.