Your Own Digital Platform

उदयनराजे यांच्या पत्रामुळेच विसर्जनाचा तिढा : शिवेंद्रराजे


सातारा : खा. श्री. छ. उदयनराजेंसह राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी खुद्द जिल्हाधिकार्‍यांकडे तीन वर्षांपूर्वी तक्रार करून मंगळवार तळ्यात गणेशमूर्ती विसर्जन करू नये, असा पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर आता उच्च न्यायालयाने तळ्यावर बंदी घातल्यानंतरही ते निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मूर्तींचे विसर्जन मंगळवार तळ्यातच होणार अशी दुटप्पी भूमिका घेत आहेत. गणेशमूर्ती विसर्जनावरून त्यांनी सातारकरांच्या भावनांशी न खेळता जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या त्या पत्रांचा खुलासा करावा, असे आव्हान आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी खा. उदयनराजेंना दिले आहे. दरम्यान, साविआचे नगरसेवक हे साशा कंपनीसह इतर कामांच्या कमिशनवर डोळा ठेवून आहेत, असा आरोपही त्यांनी पत्रकार परिषदेत केला.

आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, सातार्‍यात गणेशमूर्ती विसर्जनाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा प्रश्‍न सोडवण्याची जबाबदारी ही नगरपालिकेचीच आहे. मंगळवार तळ्याचा विषय आपल्या अंगलट येऊ नये, यासाठी सर्व खापर प्रशासनावर फोडले आहे. मंगळवार तळे आमच्या खासगी मालकीचे आहे. मूर्ती विसर्जनामुळे पाणी दूषित होत आहे. त्यामुळे या तळ्यामध्ये मूर्ती विसर्जन करू नये, असा पत्रव्यवहार खा. उदयनराजे यांनी दि. 3 सप्टेंबर 2015 रोजी, तर राजमाता कल्पनराजे यांनी दि. 8 सप्टेंबर 2015 रोजी जिल्हाधिकार्‍यांकडे केला होता. मग खासदारांनीच आता सरळ सांगावे की हा पत्रव्यवहार आम्ही न करता दामलेंनी परस्पर छापून केला आहे.

विसर्जनाचा मुद्दा ऐरणीवर आणून गोंधळ करणे ही त्यांची नेहमीचीच स्टंटबाजी आहे. गेल्या महिनाभरापासून जनतेच्या आणि गणेशभक्तांच्या भावनांशी खेळून त्यांनी गैरसमज निर्माण केला. खरी वस्तुस्थिती काय आहे ती खा. उदयनराजेंनी जनतेसमोर स्पष्ट करून सातारकर जनेतची दिशाभूल केली म्हणून जाहीर माफी मागावी.विसर्जनाचा तिढा स्वत: निर्माण करून खासदारांनी तो आता प्रशासनावर ढकलून दिला आहे. त्यांच्या या आडमुठ्यापणामुळे मी करेल तीच पूर्वदिशा असा प्रकार सुरू आहे. सातारा शहरात स्वाईन फ्ल्यूचा फैलाव वाढला आहे. पालिकेचे स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. शहरातील रस्त्याची अवस्थाही दयनीय आहे. शहरातील विविध विकास कामे होत नाहीत. खासदारांचे लक्ष निवडणुकीवर तर नगरसेवकांचे लक्ष साशा कंपनीच्या कमिशनवर आहे, अशी अवस्था होवून बसली आहे. खा. उदयनराजेंची भूमिका ही महंमद तुघलका सारखी दुटप्पी आहे. आजपर्यंत मी म्हणेल तेच झालं पाहिजे असली दंडेलशाही सातारच्या जनतेवर लादत आला आहात, हे उद्योग आता बंद करा, असेही आ. शिवेंद्रराजे म्हणाले.

खासदार दुसर्‍याला दोष देत आहेत. खासदार व राजमातांच्या पत्रामुळे विसर्जनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गेल्या 40 वर्षांत गणेश विसर्जनाचा प्रश्‍न निर्माण झाला नव्हता, असे सांगून आ. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, सातारा नगरपालिकेत साविआची सत्ता आल्यानेच हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मंडळे व त्यांच्या कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचाच हा प्रकार आहे. तुम्ही स्वत: लोकप्रतिनिधी असून स्टंटबाजी करण्याचा प्रकार करत आहात याची जाणीव करून घ्या. गणेशोत्सवाच्या तोंडावर वातावरण गढूळ करणे हे लोकप्रतिनिधींना शोभते का? असा सवालही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केला. त्यांनी गणेशभक्तांची माफी मागितली पाहिजे. मी महाराज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वशंज आहात असे सांगता मग तुम्ही जिल्हाधिकार्‍यांना मंगळवार तळे विसर्जन बंदीसंदर्भात दिलेल्या पत्राबाबत आता स्पष्टीकरण द्यावे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी यावर्षीच नव्हे तर पुढील काळातही कृत्रिम तलावाचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. कृत्रिम तळ्यासाठी कायमस्वरूपी जागा मिळण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे जागेची मागणी करणार आहे. जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी पुढाकार घेवून बुधवार नाका येथे प्रतापसिंह शेती फॉर्म हाऊसच्या जागेत कृत्रिम तळे काढण्यास सुरूवात करून विसर्जनाचा प्रश्‍न सोडवला. त्याबद्दल सर्व मंडळाच्यावतीने त्यांचा आभारी आहे.

दरम्यान, चंद्रपूरचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात डॉल्बीसाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये डॉल्बी चालते मग सातार्‍यात का नाही? असा सवाल आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रशासनाला पत्रकार परिषदेत केला.

आ. शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, न्यायालयाने डॉल्बीवर बंदी घातली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून डॉल्बी लावल्यास डॉल्बी जप्त व संबंधित गणेश मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांवर कारवाई होणार असे सांगितले आहे. तसेच पुढील वर्षी मंडळांना परवानगी देताना पोलिस प्रशासनाकडून अडचणीत वाढ होणार आहे. प्रशासनाने गणेशमंडळातील तरूणांचा आनंद हिरावून न घेता शेवटचे दोन दिवस तरी डॉल्बीला परवानगी द्यावी, असेही आ.शिवेंद्रराजे भोसले म्हणाले. पत्रकार परिषदेस अशोक मोने, जयेंद्र चव्हाण, शेखर मोेरे, प्रविण पाटील, प्रकाश बडेकर, चंद्रकांत जाधव, प्रतिक कदम उपस्थित होते.