Your Own Digital Platform

शरद पवार-मुख्यमंत्र्यांना एका व्यासपीठावर आणणार


फलटण : आगामी काळात फलटण शहरात अंडरग्राऊंड गटार योजना राबवणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खा. शरद पवार यांना एकाच व्यासपीठावर आणणार असून भूमिगत गटार योजनेचा शुभारंभ करणार असल्याची ग्वाही विधानपरिषदेचे सभापती ना. रामराजे ना. निंबाळकर यांनी दिली. नगरसेवकांनी शहरात दररोज सकाळी एक तास स्वच्छतेसाठी देवून आपले शहर सुंदर व स्वच्छ करावे, असे आवाहनही त्यांनी केले. फलटण येथे नगरपरिषद, कमिन्स कंपनी, आरोहनम संस्था यांच्या संयुक्‍त विद्यमाने महात्मा फुले चौकात शून्य कचरा प्रणाली प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ना. रामराजे ना. निंबाळकर बोलत होते.

यावेळी आ. दीपक चव्हाण, जि. प.चे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, कमिन्स इंडियाचे सी.एफ.ओ. राजीव बत्रा, कमिन्स इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक संदीप सिन्हा, पंचायत समिती सभापती सौ.रेश्मा भोसले, पाचगणी नगराध्यक्षा सौ.लक्ष्मी कर्‍हाडकर, नगराध्यक्षा सौ.नीता नेवसे, पाणी पुरवठा सभापती सुभद्राराजे नाईक निंबाळकर व मान्यवर उपस्थित होते.

ना. रामराजे म्हणाले, मी नगराध्यक्ष असताना पाण्यासाठी येणारे मोर्चे अंगावर घेतले आहेत. नगराध्यक्ष व नगरसेवकांनी प्रशासनावर अवलंबून न राहता स्वत: रस्त्यावर उतरून काम करावे. फलटण नगरपालिका स्वच्छतेत 264 नंबरवर असल्याचा आपणाला खेद वाटतो. मी स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी थांबणार नाही. सर्व नगरसेवक व नागरिकांनी स्वच्छतेसाठी सहकार्य करावे.

राजीव बत्रा म्हणाले, झिरो वेस्ट प्रोजेक्टच्या माध्यमातून आम्ही फलटण आणि आसपासच्या परिसरातील घनकचर्‍याचा प्रश्‍न सोडवणार आहोत. ज्योती जाधव यांनी आरोहणम संस्थेच्या शून्य कचरा प्रकल्पाविषयी माहिती दिली.

संदीप सिन्हा, अमितकुमार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी केले. कार्यक्रमाला नागरिक, कमिन्स इंडियाचे कर्मचारी, नगरसेवक आणि आरोहणम संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.