'कास इज वंडरफुल' ....असा परदेशी पर्यटकांचा अभिप्राय


सातारा : सातारा शहराच्या पश्चिमेस असलेल्या व जैवविविधतेने नटलेल्या कास पठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाला आहे. दुर्मीळ अन् विविधरंगी फुले पर्यटकांना आकर्षिक करीत असून, भारतासह परदेशी विदेशी पर्यटकांनी कासला भेट देऊन रविवारी येथील निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला.

सातारा शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कास पठाराने आपल्या दुर्मीळ व विविधरंगी फुलांची ख्याती सातासमुद्रापार पोहोचविली आहे. देशभरातील पर्यटकांबरोबरच परदेशी पाहुण्यांच्या हृदयात देखील येथील फुलांनी आपले स्थान पक्के केले आहे. फुलांचा हंगाम सुरू झाल्याने मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक कास पठारावर दाखल होऊ लागले आहेत.

 चालू हंगामात आतापर्यंत स्वीझर्लंड, रशिया या देशातील पर्यटकांनी पुष्प पठाराचा नजराणा अनुभवला असून, पठाराचे सौंदर्य आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले आहे. एवढेच नव्हे परतीच्या प्रवासाला निघताना विदेशी पर्यटकांनी आपल्या भाषेत फुले खूप सुंदर असल्याचा अभिप्रायही नोंदविला आहे.

सध्या पठारावर गेंद, सीतेची आसवे ही फुले मोठ्या प्रमाणावर बहरली असल्याने बहुतांशी ठिकाणी पांढऱ्या व जांभळ्या फुलांचे गालिचे दिसू लागले आहेत. फुले उमलण्यासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने काही दिवसांत पठारावर फुलांचे गालिचे पाहावयास मिळणार आहे. अबोलिमा, सोनकी, आभाळी, नभाळी, ड्रॉसेरा, कंदील पुष्प आदी प्रकारच्या फुलांना बहर आला असून, हजारो पर्यटकांची पावले कास पठाराकडे वळू लागली आहेत. गतवर्षी फुले पाहण्यासाठी रशिया, जपान, अमेरिका, इग्लंड, जर्मनी आदी देशांतील पर्यटकांनी कासला भेट दिली होती.

दरम्यान, साताऱ्याहून कासला जाण्यासाठी यवतेश्वर घाटातूनच जावे लागते. शनिवार व रविवार सलग सुट्या असल्यामुळे राज्यभरातील हजारो पर्यटकांनी कासला भेट देऊन येथील निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. मात्र, वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांना मनस्तापही सहन करावा लागला.

No comments

Powered by Blogger.