Your Own Digital Platform

फसवणूक हाच भाजपचा अजेंडा


वडूज : निवडणूकीपूर्वी भाजपने समाजातील विविध घटकांना दिलेली आश्‍वासने वार्‍यावर उडाली असून आरक्षणाबाबतही भाजपने कोेणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही. समाजाची फसवणूक करणे हा त्यांचा एकमेव अजेंडा असून मराठा समाजाला काँग्रेसने जे आरक्षण दिले होते तेही भाजप सरकारला टिकवता आले नाही. यातूनच त्यांची आरक्षणाबाबतची मानसिकता स्पष्ट होते. सगळीकडे खोटा प्रचार आणि थापा मारण्यात ते व्यस्त आहेत. आता जर अच्छे दिन म्हटले तर लोक दगडं मारतील म्हणून मुख्यमंत्री टीव्हीच्या बाहेरच येत नाहीत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली.

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सोमवारी दुपारी दुष्काळी खटाव व माण तालुक्यात दाखल झाली. यावेळी या यात्रेचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. वडूज येथे संघर्ष यात्रा दाखल झाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी हुतात्मा स्मारकात जाऊन हुतात्म्यांना अभिवादन केले. जनसंघर्ष यात्रा चौकात आल्यानंतर मुख्य चौकात बांधण्यात आलेली भाजप सरकारच्या विरोधातील भ्रष्टाचार सरकार असे उल्लेख केलेली दहीहंडी आ. हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते फोडण्यात आली. यावेळी भाजप सरकारच्या निष्क्रिय कारभाराचा उल्लेख करत काँग्रेस नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. राधाकृष्ण विखे-पाटील, आ. सतेज पाटील, आ. हर्षवर्धन पाटील, आ. जयकुमार गोरे, आ. विश्‍वजीत कदम, आ. शरद रणपिसे, आ. सुरेश कांबे यांची रॅलीत प्रमुख उपस्थिती होती.

खा. अशोक चव्हाण म्हणाले, आगामी निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या निष्क्रिय कारभाराचे वाभाडे काढण्यासाठी काँग्रेसने जन संघर्ष यात्रा सुरू केली आहे. भाजप सरकारचा चेहरा जनतेसमोर आणावाच लागणार आहे. अन्यथा सामान्यांच्या मानगुटीवर एकाधिकारशाही लादली जाईल. म्हणूनच हा संघर्ष आम्ही सुरू केला आहे. सर्व सामान्यांना न्याय देण्याची भूमिका काँग्रेसच पार पाडू शकते. त्यामुळे आगामी काळात जनतेने काँग्रेसबरोबर राहणे आवश्यक आहे.

आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, दौर्‍यादरम्यान अनेक मराठा बांधव आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. काँग्रेस सत्तेवर असताना आम्ही आरक्षण दिले होते. मात्र, भाजपने सत्तेवर आल्यानंतर गंभीरपणे तेही टिकवले नाही. मराठा समाजच नव्हे तर कोणत्याच समाजाला भाजप सरकार न्याय देऊ शकत नाही. उलट समाजात फूट पाडण्याचा त्यांचा डाव आहे.

दुष्काळी जनतेला न्याय देताना काँग्रेस सरकारने भरभरून दिले आहे. आ. जयकुमार गोरे यांनी माण-खटावमधील पाणी प्रश्‍न सोडवण्याच्या दिशेने योग्य ती पावले उचलली. याला काँग्रेसने भरघोस निधी उपलब्ध केल्यामुळे दुष्काळी भागात अनेक ठिकाणी पाणी आले आहे. तसेच त्यांच्या माध्यमातून या भागात अनेक विकासकामे आम्ही केली. लोकांनीही तसा प्रतिसाद दिला आहे. आगामी काळातही जनतेने ही साथ कायम ठेवावी, असे आ. चव्हाण म्हणाले.

दरम्यान, जनसंघर्ष यात्रेची रॅली कुरोली फाटा येथून सुरू करण्यात आली. ही रॅली शहरातील मुख्य चौकात आल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या मराठा बांधवांनी मराठा समाज बांधवाना आरक्षण मिळावे तसेच आरक्षणाबाबत काँग्रेसने आग्रही भूमिका घ्यावी याबाबतचे लेखी निवेदन दिले. या निवेदनाला काँग्रेस नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. वडूजमधील अभिवादनानंतर रॅली दहिवडीकडे रवाना झाली.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती अशोक गोडसे, तालुका अध्यक्ष विवेक देशमुख, पंचायत समिती सदस्य धनंजय चव्हाण, नगरसेवक डॉ. महेश गुरव, श्रीकांत उर्फ काका बनसोडे, सोमनाथ जाधव, हणमंत बोटे तसेच काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.