माजी मुख्यमंत्री गटाकडून दिशाभूल
कराड : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह त्यांचे समर्थक कोणत्याही विकासकामाचे श्रेय घेऊ लागले आहेत. श्रेयवादातूनच त्यांचे बगलबच्चे चुकीची व लोकांची दिशाभूल करणारी माहिती प्रसिद्धीस देत आहेत, असा आरोप आटके, कार्वे, कापील, सवादे, रेठरे खुर्द या पाच गावच्या पदाधिकार्‍यांनी, ग्रामस्थांनी पत्रकारपरिषदेद्वारे केला आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील 9 गावच्या योजनांना मुजंरी मिळाली असून 8 गावच्या योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी 7 कोटी 31 लाखांचा निधी आणल्याचे पत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे. वास्तविक कार्वे गावची योजना तीन ते चार महिन्यांपूर्वीच कार्यान्वित झाली आहे. ग्रामपंचायतीने स्वनिधीसह 14 व्या वित्त आयोगातून मीटर बसवले असून पाणी पुरवठाही सुरू आहे. असे असूनही 1 कोटी 41 लाखांचा निधी मंजूर करून आणल्याचे सांगणे म्हणजे लोकांची फसवणूकच आहे.

आटके गावच्या योजनेसाठी 1 कोटी 23 लाखांचा निधी यापूर्वीच मंजूर झाला होता. त्यातील 70 ते 80 लाखांचा निधी खर्च झाला असून उर्वरित कामांच्या पूर्ततेसाठी असणारा निधी मिळवण्यासाठी दरवर्षी ही योजना आराखड्यात समाविष्ट केली जाते. नियमित प्रक्रियेनुसार आराखड्यानुसार निधी मिळत असूनही त्याचे श्रेय घेणे म्हणजे हा केवळ राजकारणाचाच डाव आहे, असा दावाही यावेळी पदाधिकार्‍यांनी केला. 

तसेच कापील गावची योजना 2015 सालीच कार्यान्वित झाली आहे. 1 कोटी 72 लाख मंजूर असूनही ही योजना 1 कोटी 57 लाखात करण्यात आली आहे. रेठरे खुर्द गावचीही योजना याच पद्धतीने मंजूर झाली आहे. वास्तविक पूर्वी 10 टक्के लोकवर्गणी व 90 टक्के शासनाचा निधी या पद्धतीने योजना झाल्या आहेत. लोकवर्गणी भरण्याची तयारी दाखवल्यामुळेच या योजनांना मंजुरी मिळाली. या योजनांची किरकोळ कामांची बिले व अंतिम बिले आता आली आहेत. मात्र असे असूनही नव्याने निधी आणल्याचे भासवत माजी मुख्यमंत्री गटाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका पै. धनाजी पाटील, हर्षवर्धन मोहिते, रेश्मा रसाळ, सुरज सुतार, रोहित जाधव, राजेंद्र काळे, शशिकांत जाधव यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांंशी असलेले सलोख्याचे संबंध यातून ना. डॉ. अतुल भोसले कराड दक्षिणमधील विविध गावांसाठी कोट्यावधींची विकासकामे मंजूर करून आणत आहेत. मात्र ही कामे आपणच केल्याचे आमदार गटाकडून भासवले जात असून ते थांबवण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

No comments

Powered by Blogger.