बाप्पा आले!


सातारा : विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी अवघी शाहूनगरी सज्ज झाली असून, गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच सातार्‍यात काही सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजतगाजत व ढोलताशांच्या गजरात व धूमधडाक्यात बाप्पांच्या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेल्या. गुरुवारी तर सर्वत्र ‘गणपती बाप्पा मोरया..’च्या गजरात सार्वजनिक मंडळांसह घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन होणार आहे.

विघ्नहर्त्यांच्या स्वागतासाठी जनजीवन आतुरले आहे. बाप्पांच्या आगमनामुळे जिल्ह्यात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, गणेशभक्तांच्या आनंदाला भरते आले आहे. बाप्पांच्या स्वागतासाठी गणेशभक्तांचा उत्साह ओसंडून वाहत असून, अवघी शाहूनगरी सज्ज झाली आहे. त्यामुळे सातारा शहरासह अवघा जिल्हा बाप्पामय होणार आहे.

गणेशोत्सवाला गुरुवारपासून जल्लोषात सुरुवात होत आहे. बाप्पांच्या भक्तीचा महिमा सांगणार्‍या या उत्सवामुळे वातावरण बाप्पामय झाले आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येलाच सातारा शहरातील विविध मानाच्या गणेश मंडळांतील मूर्तींच्या पारंपारीक वाद्य व ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य मिरवणुका निघाल्या. मूर्तीच्या मार्गक्रमणामध्ये महागणपतीवर ठिकठिकाणी गणेशभक्तांकडून फुलांचा वर्षाव करुन पूजन करण्यात येत होते. तसेच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

दरम्यान, विघ्नहर्त्या गणरायाच्या स्वागतासाठी सार्वजनिक मंडळांच्या कार्यकर्त्यांबरोबरच घरोघरी अबालवृद्धांनी जय्यत तयारी केली आहे. बाप्पांच्या स्वागताच्या धांदलीने जिल्ह्यातील वातावरण गणेशमय झाले आहे. पूर्वसंध्येलाच गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आलेे. सार्वजनिक मंडळांबरोबरच घरोघरी बाप्पांच्या स्वागताची धांदल शिगेला पोहचली होती. घरगुती गणेशोत्सावासाठी गणेश मूर्ती खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. ग्रेडसेपरेटरच्या कामामुळे वाहतुकीचे मार्ग बदलले असल्याने गणेशभक्तांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. तसेच शहरात मोक्याच्या ठिकाणी वाहतूक कोेंडी होत होती.

शहराबरोबरच जिल्ह्यातील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडप सजावटीची कामे जवळपास पूर्ण झाले. काही मंडळांचे कार्यकर्ते सजावटीच्या कामात मग्न असल्याचे चित्र रात्री उशीरापर्यंत दिसत होते. शहर व परिसरात ठिकठिकाणी मंडळांनी आकर्षक कमानी उभारून विद्युत रोषणाईही केली आहे. मंडळांनी देखावे व सजावट करण्यास सुरूवात केली आहे. पुढील अकरा दिवस उत्सवाचे असल्याने वातावरणाचा नुर पालटायला आता सुरूवात झाली आहे.मोठ्या गणेश मंडळांच्यामूर्ती गेल्या दोन दिवसांपासून वाजतगाजत प्रतिष्ठापनेसाठी आणल्या जात होत्या. बाप्पांच्या आगमनामुळे सपूंर्ण शहरासह अवघा जिल्हा बाप्पामय झाला आहे.

No comments

Powered by Blogger.