चाकूचा धाक दाखवून डॉक्टरला लुटले


वडूज : चाकूचा धाक दाखवून वडूज येथील एका डॉक्टरला लुटल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी व रोख रुपये असा 15 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. वडूज पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, डॉ. संतोष मोरे शुक्रवारी दुपारी तडवळे गावाच्या हद्दीत आपली चारचाकी गाडी घेऊन जात होते. पिंगळजाई मंदिराजवळ त्यांच्या गाडीला अनोळखी दुचाकीस्वारांनी कट मारला. दरम्यान, डॉ. मोरे यांनी गाडी थांबवून त्यांना विचारणा केली असता दोघा अज्ञातांनी डॉ.मोरे व त्यांच्या मुलाला शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. डॉ.मोरे यांनी वडूज पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी वडूज-दहिवडी रोडला असणार्‍या मंदिरामध्ये डॉ.मोरे आपल्या चुलत भाऊ व मुला बरोबर देवदर्शनाला गेले होते. यावेळी तडवळे येथे मारहाण करणार्‍या चौघांनी आमच्या विरुद्ध तक्रार देतोस काय तू, आम्हाला काय समजतोस? तुमच्याकडे बघतो असे म्हणत त्यातील दोघांनी मी धीरज दिनकर मदने व त्याच्या सोबत असलेल्या इसमाने मी अक्षय अशोक मदने अशी नावे सांगून या डॉक्टर व त्यांचा चुलत भाऊ यांच्याबरोबर झटापट केली. डॉ.मोरे यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या उजव्या हातातील अर्धा तोळे सोन्याची अंगठी व रोख रक्कम लांबवली. दरम्यान, डॉक्टरांच्या चुलत भावास लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेची वडूज पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

वडूज पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार व पो. हवा. संग्राम बाबर यांनी तत्काळ अक्षय मदन, धीरज मदने व सागर उत्तम जाधव यांना रात्री उशीरा अटक केली. शनिवारी या तिघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.