Your Own Digital Platform

पाडेगाव टोल नाक्यावर कंटेनर दुकानात घुसला


लोणंद : लोणंद - निरा रोडवर बंद अवस्थेत असणाऱ्या पाडेगाव टोल नाक्यावरील अपघाताची मालिका सुरूच आहे. शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास लोणंद वरून निरा कडे जाणाऱ्या वीस चाकी कंटेनर चालकाचा ताबा सुटला. हा वीस चाकी ताबा सुटलेला कंटेनर टोल नाक्याच्या बाजुला असणाऱ्या पाडेगाव ग्रामपंचायतीच्या व्यापारी गाळ्यांच्या दुकानात घुसला. त्यामध्ये बारा दुकांनाचे नुकसान झाले असून त्यापैकी नऊ गाळे जमीनदोस्त झाले आहेत. या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

सुदैवाने हा अपघात रात्रीच्या वेळी झाला त्यामुळे जीवितहानी टळली आहे. दरम्यान, युती शासनाने सुमारे चार वर्षापासुन टोल वसुली बंद केलेली असतानाही पाडेगाव टोल नाक्याचे शेड आणि काउंटर तेथेच असल्याने वारंवार लहान मोठे अपघात होत असतात. हा टोल नाका काढण्यात यावा अशी मागणी पाडेगाव ग्रामस्थ व वाहन चालकांनी केली आहे.

पुणे - पंढरपूर मार्गावर लोणंद - निरा दरम्यान निरा नदीजवळ पाडेगाव गावचे हद्दीत टोल नाका आहे. या टोल नाक्या शेजारीच पाडेगाव ग्रामपंचायचे व्यापारी गाळे आहेत. त्यामध्ये हॉटेल, लॉन्ड्री, चिकन, केस कर्तनालय, फोटो, लॉटरी, चायनीज असे छोटे व्यवसाय आहेत.

अपघाताची माहीती मिळताच लोणंद पोलिस स्टेशनचे सपोनि गिरिश दिघावकर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात पाडेगाव ग्रामपंचायतीने बांधलेल्या व्यापारी गाळे व लघु व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताचा पंचनामा लोणंद पोलिस करत आहेत.