भविष्यात ही संस्था आधुनिक पद्धतीने चालवू : दिलीपसिंह भोसले


फलटण : 2017-18 या आर्थिक वर्षात संस्था कर्जमुक्त झाली असून संस्थेस निव्वळ नफा 4 लाख 53 हजार 669 रुपये एवढा झाला आहे. याचा विचार करुन संचालक मंडळाने सभासदांना 15% डिव्हीडंट देण्याची तरतूद केली आहे. भविष्यात ही संस्था आधुनिक पद्धतीने चालवून कै. हणमंतराव पवार (आण्णा) यांचे स्वप्न साकारण्याचा आपला मानस आहे, असे सहकार महर्षी हणमंतराव दिनकरराव पवार सहकारी कुक्कुटपालन सोसायटीचे माजी चेअरमन व मार्गदर्शक संचालक दिलीपसिंह भोसले यांनी सांगीतले. संस्थेच्या 39 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. 

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, व्हाईस चेअरमन बबनराव शिंदे, संचालक मंडळातील सदस्य राजाराम फणसे, पोपटराव इवरे, सुनिल सरगर, सुभाष आढाव, महिला संचालिका अ‍ॅड.सौ.मधुबाला भोसले, सौ.राजस भोईटे, सौ.स्वाती फुले, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश देशपांडे, श्रीराम बझारचे जनरल मॅनेजर जयराम राजमाने, सद्गुरु पतसंस्थेचे जनरल मॅनेजर संदीप जगताप यांची उपस्थिती होती. 

प्रारंभी मान्यवरांचे हस्ते प्रतिमा पूजन करुन व श्रद्धांजली अर्पण करुन सभेस सुरुवात झाली. आपल्या भाषणात दिलीपसिंह भोसले पुढे म्हणाले, स्व.आण्णा यांना अभिप्रेत असलेला सहकार जपण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने केला आहे. नैसर्गिक संकटामुळे दुसरीकडून अंडी आणून विकावी लागली. पक्षांना शुद्ध पाणी पुरविणे, अंड्याचे ब्रँडींग करण्याचे मशिन आणणे या योजना राबविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. भविष्यात आधुनिक तंत्रज्ञान वापरुन हा व्यवसाय वाढवता येईल, असे सांगून संस्था कर्जमुक्त झाल्याने कामगारांचे हित जपण्याचा, त्यांना सोयी सुविधा पुरवण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही भोसले यांनी यावेळी दिली. 

संस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले यांनी उपस्थितांचे स्वागत केल्यावर संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना सांगितले की, अहवाल सालात वार्षिक उलाढाल 14 कोटी 73 लाख रुपयांची झाली असून संस्था कर्जमुक्त झाली आहे. संस्थेचे भाग भांडवल 3 लाख 15 हजार 700 रुपये असून संस्थेची गुंतवणूक 25 लाख 84 हजार 72 रुपये आहे. पक्षी क्षमता 40 हजार एवढी आहे. सध्या संस्थेचे कार्यालयाचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. मध्यंतरी बंद पडलेली संस्था दिलीपसिंह भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चालवून नफ्यात आणली आहे. 

संस्थेचे व्यवस्थापक मानाजीराव चव्हाण यांनी विषयपत्रिकेचे वाचन केल्यावर विषयक्रमांक 1 ते 10 यावर चर्चा होऊन सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. 

याप्रसंगी श्रीराम बझारचे संचालक मारुती (बापू) गावडे यांनी सांगीतले की, सदरची सदरची संस्था स्थापन करताना स्व.हणमंतराव पवार यांच्यावर टिका झाली होती. परंतू चांगले काम करुन त्यांनी संस्था नावारुपाला आणली. सध्याचे संचालक मंडळ सभासदांच्या हिताचे निर्णय घेत आहे.

यावेळी व्यंकटेश देशपांडे म्हणाले, कै. आण्णांच्या विचारांची धुरा घेऊन आज ही संस्था महाराष्ट्रातील अग्रणी संस्था ठरली आहे. सकारात्मक भूमिकेतून प्रगतीकडे चालणारी हि संस्था असून संचालक मंडळाने सभासदांचा विश्‍वास सार्थ करून दाखविला आहे.

सभेसाठी श्रीराम बझारचे संचालक बापुराव गावडे, सुभाष कर्णे, शितल अहिवळे, महादेवराव पोकळे, मल्टीस्टेटचे संचालक सुनिल पोरे, कराड अर्बन बँकेचे मॅनेजर पोरे यांची उपस्थिती होती. 

संचालक राजाराम फणसे यांनी आभार मानले.

No comments

Powered by Blogger.