Your Own Digital Platform

सिगारेटसाठी पानटपरी चालकाला मारहाण


सातारा : कोंडवे (ता.सातारा) गावच्या हद्दीत नितीराज ढाब्याजवळील पानटपरी चालकास फुकट सिगारेट देण्यासाठी सोमवारी रात्री चौघांनी मारहाण केली. मारहाण करत असतानाच त्या चौघांनी टपरीत असणारी दोन सिगारेटची पाकिटे आणि रोकड हिसकावून नेली. याप्रकरणी चार अज्ञातांवर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोंडवे गावच्या हद्दीतून जाणार्‍या सातारा-वर्ये रोडवर ढाब्याजवळ आनंदराव बाळकृष्ण गायकवाड (रा. कुशी, ता.सातारा) यांची पानटपरी आहे. सोमवारी रात्री गायकवाड हे पानटपरीत बसले होते. त्याठिकाणी साडेसात वाजण्याच्या सुमारास चार युवक आले. त्या युवकांनी गायकवाड यांच्यांकडे फुकट एक सिगारेट मागितली. 

सिगारेट फुकट देण्यास नकार दिल्याने त्या युवकांनी वाद घातला. वादानंतर त्या युवकांनी गायकवाड यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. हल्ला झाल्याने गायकवाड जखमी झाले. याच दरम्यान त्या चौघांनी दहशत माजवत टपरीतील पाचशे रुपयांची रोकड आणि तीन हजार रुपये किंमतीची सिगारेटची दोन पाकिटे घेवून मारहाण केली.

मारहाणीत जखमी झालेल्या गायकवाड यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मंगळवारी रात्री गायकवाड यांनी याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.