Your Own Digital Platform

तुमच्या विसर्जनाची वेळ जवळ आली; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंवर पलटवार


सातारा : ज्या पालिकेत एकहाती सत्ता आहे, त्याच पालिका प्रशासनाने न्यायालयाचे आदेश पाळण्याचा निर्णय घेतला असून, त्या आदेशाप्रमाणे मंगळवार तळ्यात विसर्जन करण्यास पालिकेनेही बंदी केली आहे. जास्त फुशारक्या मारू नका. कारण, सातारा पालिकेनेच तुमचे नाक कापले आहे, असा प्रतिटोला आ. शिवेंद्रराजे यांनी खा. उदयनराजे यांना लगावला.दरम्यान, मला माझी पायरी चांगलीच ठाऊक आहे. पायर्‍या उतरताना आणि चढताना माझा कधी तोल गेला नाही आणि जाणारही नाही. कोणाला कोणत्या पायरीवर ठेवायचे हे सातारकर ठरवतीलच. 

पण, पायर्‍या चढताना, उतरताना कोणाच्या कमरेवरची पँट खाली घसरते आणि कोणाचा तोल सुटतो, हे सातारकरांनाही माहिती आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पायर्‍या मोजा. बाप्पांचे विसर्जन मंगळवार तळ्यात होऊ शकले नाही. पण, तुमच्या विसर्जनाची वेळ आता जवळ आली आहे. लवकरच जनताच तुमचे विसर्जन करेल, असा इशाराही आ. शिवेंद्रराजे यांनी दिला आहे.

खा. उदयनराजे यांनी दिलेल्या उत्तराला प्रत्युत्तर देताना आ. शिवेंद्रराजे यांनी पत्रकात म्हटले आहे की, मी म्हणेल तसंच झालं पाहिजे, या अट्टाहासापोटी खासदारांनी सातार्‍यातील गणेशमूर्ती विसर्जनाचा प्रश्‍न चिघळवला. काहीही झाले तरी मंगळवार तळ्यात विसर्जन करणारच अशी आडमुटी आणि अडेलतट्टू भूमिका घेणारे खासदार आता माझ्यामुळेच प्रशासनाने कृत्रीम तळे खोदल्याचे सांगत आहेत. मंगळवार तळे का कृत्रीम तळे? नेमकी तुमची भुमिका काय होती हे एकदा स्पष्ट करा. 

मंगळवार तळ्यातील विसर्जनास बंदी करण्याची पत्रे तुम्ही आणि तुमच्या मातोश्रींनी प्रशासनाला दिली. ते पत्र घ्यायला चेतक आला होता का कृष्णा हे तुम्हालाच माहिती. पत्रावर सही करताना झोपेत होता का तंद्रीत होता? का तुमचा मोत्या सही घेताना तुम्ही भिंतीला धरुन उभे होता? 2015 मध्ये पाणीटंचाई होती, असे सांगून तुम्ही सातारकरांना भुलवू नका. अगदी 60 वर्षात कधीही मंगळवार तळे आणि मोती तळ्यातील पाणी कोणीही पिण्यासाठी वापरलेले नाही. त्यामुळे टंचाईचा आणि या तळ्यांचा संबंधच नाही. टंचाईचे नियोजन करण्यासाठी विसर्जनास बंदी आणल्याचे धादांत खोटे सांगणारे खासदार सातारकरांना तळ्यातील घाण पाणी पाजणार होते काय? असा सवाल आ. शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला आहे.

 विसर्जनाचा प्रश्‍न निर्माण करुन नागरिकांना, गणेश मंडळांना आणि जिल्हा प्रशासनाला वेठीस धरुन तुम्ही काय मिळवले? केवळ थापेबाजी आणि डायलॉगबाजी करुन प्रश्‍न सुटत नसतात, हे तुम्ही पुन्हा एकदा सिध्द केले आहे. सातारा पालिकेनेच तुम्हाला तोंड दाखवायला जागा ठेवली नसून पालिकेने मंगळवार तळ्यात विसर्जनास बंदी केली असल्याने तुमचे नाकच कापले गेले. त्यामुळे तुमचा तिळपापड होत असून तुमचे मानसिक संतुलन ढळत चालले आहे. 

पत्रकात म्हटले आहे की, 40 वर्षात काय केलं, संस्था बुडवल्या, भ्रष्टाचार केला, या तुणतुण्या शिवाय तुमच्याकडे बोलायला काहीच नाही. हा पाडा आता बंद करा. आमच्या संस्थांची काळजी तुम्ही करु नका. यासाठी मी आणि सभासद समर्थ आहोत. अजिंक्यतारा कारखान्याच्या प्रदूषणाचेही प्रद्रूषण मंडळ पाहून घेईल. तुम्ही गेल्या 10 वर्षात काय दिवे लावले? हा प्रश्‍न विचारणे म्हणजे गाढवापुढे गिता वाचण्यासारखे ठरेल. तुम्ही सातारा मतदारसंघाचे खासदार आहात का सातारा शहराचे, हाच प्रश्‍न आता तमाम जनतेला पडला आहे. स्वत: काही करायचे नाही. 

दुसर्‍यांनी चांगले केले तर, तुम्हाला बघवणार नाही. साधी एक पतसंस्था काढायची अक्‍कल नाही, अशांनी आमच्या संस्थांबद्दल बोलणे म्हणजे सुर्याकडे बोट दाखवण्यासारखे आहे. स्वत: महसूलमंत्री असताना सातारा जिल्ह्यातील गोरगरीब आणि कष्टकरी जनतेच्या जमिनीवर स्वत:च्या नावाचे शिक्के मारले. हजारो शेतकर्‍यांना देशोधडीला लावून टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार कोणी केला? या हजारो शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करण्याची थापेबाजी करणारा जनतेचा कैवारी कोण, हे जनतेला चांगलेच माहित आहे. हे म्हणजे स्वत:चे ठेवायचे झाकून आणि दुसर्‍याचे बघायचे वाकून, अशी गत खासदारांची असल्याची टिकाही आ. शिवेंद्रराजेंनी केली.

त्यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, तुमच्या लहरीपणामुळे विसर्जनाची काय परिस्थिती झाली? ज्या मंगळवार तळ्यात विसर्जन होत होते ते तुम्ही मायलेकरांनी बंद पाडले आणि आता त्याच तळ्यात विसर्जन करण्याचा अट्टाहास करुन ‘हम करे सो कायदा’ करण्याचा प्रयत्न तुम्ही केला. मी कोणीतरी वेगळा आहे, हे दाखवण्याचा तुमचा स्टंट तुमच्याच अंगलट आला आहे. तुमची थापेबाजी, भंपकगिरी आणि ड्रामेबाजी आता लोकांना कळून चुकली आहे. हळूहळू तुमचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे आणि हे जास्त दिवस चालणार नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.

माझी दाढी आणि विसर्जन याचा काही संबंध आहे का? पण, विषयाला बगल देण्यासाठी तुम्ही दाढीकडे गेलात. माझ्या दाढीची काळजी तुम्ही करू नका. मला दाढी आहे म्हणून दाढी येते. तुम्हाला उगवती का नाही, उगवली तर राहील का नाही, अशी चिंताजनक अवस्था तुमची आहे. ज्या सातारकरांसमोर तुम्ही आणि मी दोघेही लहानाचे मोठे झालो, ज्या सातारकरांनी दोघांनाही घडवले, त्यांच्यासमोर माफी मागण्यात कमीपणा वाटण्याचे कारणच काय? अजिंक्यतारा बँक अडचणीत आली. पण, बँक विलीनीकरण करुन ठेवीदारांना त्यांचे पैसे परत दिले. 

बँक अडचणीत आल्याबद्दल मी नगरपालिका निवडणुकीच्या जाहिर सभेत गांधी मैदानावर सातारकरांची आणि तमाम जनतेची माफी मागितली आहे. यात मला कमीपणा वाटला नाही. आज तुम्ही तमाम सातारकरांना वेठीस धरुन विसर्जनाचा तेढ निर्माण केला. गणेशमंडळांमध्ये संभ्रम निर्माण करुन हा प्रश्‍न सोडवण्याऐवजी चिघळवला. आता प्रशासनाने कृत्रीम तळे खोदले तर, माझ्यामुळेच खोदले असे निर्लज्जपणे सांगता. याबद्दल थोडीतरी शरम बाळगा आणि सातारकरांची माफी मागा. माफी मागण्यात तुम्हाला कमीपणा वाटण्याचे कारण काय, असेही आ. शिवेंद्रराजे यांनी म्हटले आहे.