भोंदू बुवा गजाआड; रोकडसह सोने जप्त


कराड : ओंड (ता. कराड, जि. सातारा) येथे पोलिसांनी अंनिसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मदतीने कारवाई करून भोंदू बुवाला गजाआड केले. या कारवाईमध्ये भोंदू बुवाकडून सोन्याच्या अंगठ्या व रोख रक्कम तसेच देवीच्या नावावर लोकांकडून घेतलेले कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत.

या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. कराड तालुक्यातील ओंड येथे गेली वीस वर्षांपासून भोंदू बुवाने बाजार मांडला होता. याबाबत काही दिवसांपूर्वी अनिसकडे तक्रार झाल्यानंतर अनिसच्या कार्यकर्त्यांनी याची खात्री करून घेतली. त्यानुसार रविवार दि.९ रोजी सकाळी पोलिसांना बरोबर घेऊन अनिसचे कार्यकर्ते भोंदू बुवाच्या अड्ड्यावर पोहोचले. तेथे भोंदू बुवाला ताब्यात घेऊन पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली असता सुमारे लाखाहून अधिक रुपयांच्या सोन्याच्या अंगठ्या तसेच रोख रक्कम याशिवाय देवीच्या नावावर येणार्‍यांकडून घेतलेले अंदाजे चार पोती कपडे पोलिसांना आढळून आली.

भोंदू बुवा एका व्यक्तीकडून अंदाजे २० ते २५ हजार रुपये घेत असल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक अमावस्याला तो याबाबतचा बाजार भरवत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी व अंनिसच्या कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे.

No comments

Powered by Blogger.