Your Own Digital Platform

न्यू फलटण शुगर वर्क्सची विक्री


फलटण : साखरवाडी, ता. फलटण येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर कारखान्याच्या विक्रीचा निर्णय उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांच्या मध्यस्थीने 151 कोटी रुपयांना ठरला असून, त्यापैकी 10 कोटी रुपयांची रक्‍कम बुधवारी (दि. 12) थेट शेतकर्‍यांच्या बँक खात्यांवर जमा करण्याचे ठरले आहे. त्यानंतर लगेचच 41 कोटी रुपये देण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकर्‍यांनी सोमवारी आमरण उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर तातडीची बैठक घेऊन हा निर्णय निश्‍चित करण्यात आला.

 सोमवारी (दि. 10) उपविभागीय अधिकारी संतोष जाधव यांच्या दालनात न्यू फलटण शुगर वर्क्स (साखरवाडी)चे चेअरमन प्रल्हादराव साळुंखे-पाटील व संचालक धनंजय साळुंखे-पाटील यांच्यात व उद्योजक राजेंद्र काकडे यांच्यात व्यवहार ठरला. गुरुवारी (दि. 6) राजेंद्र काकडे यांनी तहसीलदार विजय पाटील यांच्यासमोर शेतकर्‍यांना 10 कोटी रुपयांची रक्‍कम आपण तातडीने देऊ, असे आश्‍वासन दिले होते. तद्नंतर हा व्यवहार कसा पूर्ण करायचा, यावर काथ्याकूट झाला. अखेर सोमवारी हा व्यवहार निश्‍चित झाला. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी रविवारी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला होता. या पार्श्‍वभूमीवर उपविभागीय अधिकारी जाधव यांनी साळुंखे-पाटील व काकडे यांची तातडीची बैठक बोलावून हा व्यवहार पूर्ण केला.

या व्यवहारात ठरल्याप्रमाणे सोमवारी साळुंखे-पाटील व त्यांच्या कूटूंबियांकडे असणारे 67.54टक्के शेअर्सपैकी 10 टक्के शेअर्स त्याचबरोबर चेअरमन व संचालकांचे राजीनामे उपविभागीय अधिकारी जाधव यांच्या ताब्यात दिले आहेत.

 बुधवार दि. 12 रोजी शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये काकडे यांनी 51 कोटी रुपयांपैकी 10 कोटी रुपयांची रक्कम दिलेल्या यादीप्रमाणे बँक खात्यावर जमा करायची आहे. 51 कोटी रुपयांपैकी 41 कोटी रुपये रक्कम शुक्रवार दि. 14 रोजी जमा करण्याची आहे. शनिवार दि. 15 रोजी शेतकर्‍यांची देणी दिल्यानंतर व शेअर्सपोटी असलेले 8 कोटी रुपये जमा झाल्यानंतर सर्व संचालकांचे राजीनामे मंजूर करुन देवून व राहिलेले शेअर्स काकडे व ते सांगतील त्या नावावर वर्ग करण्यात येतील. या व्यवहारात ठरलेल्या रक्कमेनुसार 151 कोटी रुपयांपैकी 59 कोटी रुपये वजा जाता उर्वरित रक्कम म्हणजेच 92 कोटी रुपये ठरलेल्या करारापासून तीन महिन्यात साळुंखे-पाटील यांच्याकडे वर्ग करायची आहे. 151 कोटी रुपयांवरील सर्व देणी देण्याची जबाबदारी साळुंखे-पाटील कुटूंबियांची राहणार आहे.

दरम्यान, सोमवारी झालेल्या बैठकीत खा. राजू शेट्टी यांनीही राजेंद्र काकडे व प्रल्हादराव साळुंखे -पाटील यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधला. स्वाभिमानीचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर व तालुकाध्यक्ष नितीन यादव यांनी राजू शेट्टी यांच्या मध्यस्थीने शेतकर्‍यांची देणी अगोदर अदा करण्याविषयी आग्रह धरला. त्यावर बैठकीत एकमत झाले.

बैठकीस प्रल्हादराव साळुंखे -पाटील, धनंजय साळुंखे- पाटील, सतिश काकडे, राजेंद्र काकडे, राजेंद्र भोसले, धनंजय महामुलकर, नितीन यादव यांच्यासह शिरस्तेदार अभिजीत सोनवणे यांच्यासह शासकीय अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.