प्रदूषण मंडळाच्या रडारवर विसर्जन ठिकाणे


सातारा : 
मांगल्याचे प्रतिक असलेल्या गणेशोत्सवाची धामधूम उद्यापासून सुरू होत आहे. त्यासाठी प्रदूषण मंडळाने कंबर कसली असून जल प्रदूषण रोखण्यासाठी जिल्ह्यातील 14 विसर्जन ठिकाणांवर वॉच ठेवण्यात येत आहे. येथील पाण्याचे नमुने प्रदूषण मंडळाकडून घेण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे सर्व्हेही सुरू करण्यात आला आहे. सातारा शहरातील मंगळवार तळे, मोती तळे, फुटका तलाव, महादरे तलाव, हत्ती तळे, संगम माहूली येथील कृष्णा नदी, वर्ये येथील वेण्णा नदी. कराड तालुक्यातील कराड शहरातील कोयना व कृष्णा नदी येथील प्रितीसंगम, फलटण तालुक्यातील निरा उजवा कॅनॉल, निरा नदी, वाई तालुक्यात वाई शहर, कृष्णा नदी परिसर, खंडाळा तालुक्यात शिरवळ येथील निरा नदी, सांगवी येथील निरा नदी, महाबळेश्‍वर येथील वेण्णा लेक व वेण्णा नदी यासह जिल्ह्यातील सुमारे 14 ठिकाणचे पाण्याचे नमुने गणेशात्सवापूर्वी व विसर्जनानंतर गोळा करण्यात येणार आहेत. हे पाणी नमुने दीड दिवसाचे गणेश विसर्जनावेळी, सातव्या दिवशी व अनंत चतुर्थीनंतरच्या दुसर्‍या दिवशी घेतले जाणार आहेत.यासाठी क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्र निरीक्षकांच्या पथकांची नियक्ती करण्यात आली आहे.

गणेशोत्सव शांततेत व उत्साहात पार पाडण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी कायदे पायदळी तुडवून प्रदूषणाला खतपाणी घातले जात आहे. नदी पात्रात सर्रास फेकले जाणारे निर्माल्य व इतर साहित्यामुळे जलप्रदुषण होते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक संस्था संघटना काम करत आहेत मात्र, त्यांच्या जनजागृतीलाही अनेक मंडळांच्या कार्यकर्ते व नागरिकांवर काहीही फरक पडत नसल्याचा आजवरचा अनुभव आहे. असे असले तरी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील जलप्रदुषण व हवा प्रदुषण रोखण्यासाठी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ सरसावले आहे. मात्र, त्यांनी दिलेल्या सूचनांचा संबधित स्थानिक स्वराज्य संस्थेने सकारात्मक प्रतिसाद देऊन कार्यवाही केल्यास जलप्रदूषण कमी होण्यास मदत होईल.

No comments

Powered by Blogger.