Your Own Digital Platform

'न्यू फलटण'चे 'रामा'यण

स्थैर्य, सातारा/फलटण: साखरवाडी (ता. फलटण) येथील न्यु फलटण शुगर वर्क्स हा साखर कारखाना अर्थिक गर्तेत अडकल्याने कारखान्याचे बहुतांश शेअर्स ज्यांच्याकडे आहेत ते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी शेअर्स विक्रीचा व्यवहार उद्योगपती राजेंद्र काकडे यांच्यासोबत सुरु केलेला आहे. या कारखान्याच्या शेअर्सच्या विक्रीचा व्यवहार बुधवार (दि. 19) पर्यंत पूर्ण होईल व शेतकर्‍यांच्या खात्यावर थकित ऊस बिलापैकी दहा कोटी रुपये जमा करण्यात येतील, असे आश्‍वासन राजेंद्र काकडे यांनी दैनिक स्थैर्यकडे दिलेल्या खास प्रतिक्रीयेद्वारे दिले आहे. दरम्यान, गत हंगामातील ऊस उत्पादकांच्या ऊसाचे बिल अद्यापही न मिळाल्याने उत्पादक हवालदिल झाले आहेत. काल शनिवार (दि. 15) रोजी शेतकर्‍यांनी महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेतली. व आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा, यासाठी स्वत: ना. श्रीमंत रामराजे यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी ना. श्रीमंत रामराजे यांच्याकडे केली आहे. आता, ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या कारखान्यात लक्ष घालणार का? व दुसरीकडे राजेंद्र काकडे यांनी दैनिक स्थैर्यला सांगितल्याप्रमाणे बुधवार (दि. 19) रोजी ऊसाचे बिल मिळणार का? असे सवाल उपस्थित होत आहेत. न्यु फलटण शुगरच्या सुरु असलेल्या रामायणात पुढे काय होणार हे प्रभू श्री‘राम’ यांनाच ठावूक असेल.

शेतकर्‍यांचे ना. श्रीमंत रामराजेंना साकडे
स्थैर्य, फलटण : न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी ता. फलटण या साखर कारखान्याने गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या संपूर्ण ऊसाचे पेेमेंट अद्याप केले नाही, यावर्षीचा गळीत हंगाम सुरु होण्यासंबंधी साशंकता असल्याच्या पार्श्‍वभूमीवर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, साखरवाडी व परिसरातील अन्य ग्रामस्थ आणि कामगार  संघटनेचे पदाधिकारी व कामगारांनी आज (शनिवार) फलटण येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेवून साखरवाडी प्रश्‍नात लक्ष घालण्याची मागणी त्यांच्याकडे करीत आता तुमच्याशिवाय हा प्रश्‍न सुटणार नसल्याने आपण तातडीने लक्ष घालावे असे साकडे त्यांना घातले.
न्यू फलटण शुगर वर्क्स चालविणार्या प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी गेल्या 7/8 वर्षात हा कारखाना योग्यप्रकारे चालविला त्यापूर्वी बंद पडलेला हा कारखाना सुरु करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि साखरवाडी परिसराने त्यांना सक्रिय साथ केली मात्र गतवर्षी साखरवाडी कारखाना एकुणच साखर व्यवसायावर आलेल्या संकटामुळे अन्य साखर कारखान्याप्रमाणेच आर्थिक संकटात सापडला असताना प्रल्हादराव साळुंखे (पाटील) यांनी हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी खा. शरदराव पवार यांच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले त्याचप्रमाणे साखर व्यापारी व उद्योजकांना अर्थसहाय्यासाठी अनेक पर्याय देवून मदत करण्याची विनंती केली त्यातून काही उद्योजक व साखर व्यापारी पुढे आले मात्र कोणताही व्यवहार पूर्ण झाला नसल्याने आता ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारही मोठ्या आर्थिक संकटात सापडले असतानाच उभ्या ऊसाच्या गाळपाचा प्रश्‍नही कठीण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर यातून मार्ग काढण्यासाठी ऊस उत्पादक शेतकरी व अन्य संबंधीतांनी खूप प्रयत्न केले मात्र अद्याप तोडगा निघाला नसल्याच्या पार्श्‍वभूमीवर वरीलप्रमाणे सर्व घटकांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेवून त्यांच्याकडे हा प्रश्‍न सोडविण्यासाठी साकडे घातले आहे.
दरम्यान नुकतेच उद्योजक राजेंद्र काकडे यांच्याशी प्रांताधिकारी कार्यालयात या कारखाना प्रश्‍नात झालेल्या चर्चेनुसार ऊसाचे पेमेंट व अन्य देणी देण्यासाठी काकडे यांनी 151 कोटी रुपये देण्याचे मान्य केले त्यासाठी कारखान्याचे शेअर्स व विद्यमान संचालकांचे राजीनामे प्रांताधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आले 151 कोटींच्या व्यवहारातील 10 कोटी रुपये दि. 12 रोजी, 41 कोटी रुपये दि. 14 रोजी व उर्वरित रक्कम त्यानंतर देण्याचे काकडे यांनी मान्य केले मात्र प्रत्यक्षात 10 कोटी व 41 कोटी रुपये जे ऊस उत्पादक शेतकर्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे ठरविण्यात आले होते ते जमा न झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटातून बाहेर पडता पडता त्यातच अडकतो की काय अशी शंका व्यक्त करीत ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि साखरवाडी परिसरातील नागरिकांनी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भेट घेवून या प्रश्‍नात आता तुम्हीच लक्ष घाला आणि या प्रश्‍नात तोडगा काढून ऊस उत्पादकांना गतवर्षीच्या हंगामात गाळपास आलेल्या ऊसाचे पेमेंट देण्याची आणि यावर्षी पूर्ण क्षमतेने गळीत हंगाम सुरु करण्याची जबाबदारी स्विकारा असे साकडे घातले.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यापूर्वीही आपण साखरवाडी कारखाना प्रश्‍नी लक्ष घालुन ऊस उत्पादक व कामगारांना दिलासा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची त्यासाठी प्रसंगी श्रीमंत मालोजीराजे सहकारी बँक व सईबाई पतसंस्थेतूनही पैसे दिल्याची आठवण करुन देत आताही आपण याप्रश्‍नात अनेकांशी संपर्क साधून योग्य निर्णय होण्यासाठी प्रयत्नशील आहोत परंतू हा कारखाना मोठ्या आर्थिक गर्तेत गुंतला असल्याने कोणी त्यामध्ये गुंतवणूक करण्यास सहजासहजी पुढे येत नाही तथापी तरीही आपण या प्रश्‍नात योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे निदर्शनास आणून दिले.