जिल्ह्यात कापूर विक्रीत 3 क्विंटलने वाढ


शाहूपुरी : स्वाईन फ्लू फैलावल्यामुळे खबरदारी म्हणून अनेकांनी कापराचा आधार घेतला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात जिल्ह्यात तब्बल 1 टन कापराची विक्री झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत कापराच्या विक्रीमध्ये महिनाभरात तब्बल 300 किलोची आणखी भर पडली आहे. त्यामुळे कापूर विक्रेत्यांची चांदी झाली आहे. शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने शहरी व ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून घरगुती उपचारालाच प्राधान्य दिले आहे.

सातारा जिल्ह्यात स्वाईन फ्लू चा विळखा वाढतच चालला आहे. दिवसेंदिवस या आजाराने रुग्ण दगावण्याची संख्या वाढतच चालली असल्याने नागरिकांच्या मनात स्वाईन फ्लूची भीती बळावली आहे. गणेशोत्सवानंतर या आजाराने जिल्ह्यात थैमान मांडले आहे. दरवर्षी गणेशोत्सव काळात जिल्ह्यात 600 ते 700 किलो कापराची विक्री होत असे परंतु यावर्षी जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांनी या आजाराची प्रचंड धास्ती घेतली आहे. 

स्वाईन फ्लूचे विषाणू कापरामुळे मरून जात असल्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा व स्वस्तातला उपाय म्हणून कापूर जवळ बाळगण्यास सुरवात केली आहे. यामुळे जिल्ह्यात कापराच्या खपात तब्बल 300 ते 400 किलोने वाढ झाली असून गेल्या महिनाभरात जिल्ह्यात तब्बल 1 टन कापराची विक्री झाली आहे. या स्वाईन फ्लूची नागरिकांच्या मनात जरी भीती बाळवली असली तरी कापूर विक्रेत्यांची मात्र चांदी झाली आहे.

No comments

Powered by Blogger.