माण तालुक्यात 3.24 मीटरने भूजल पातळी घटली


सातारा : सातारा जिल्ह्याच्या पश्‍चिमेला यावर्षी चांगला पाऊस झाल्याने लहान मोठी धरणे भरली. मात्र, पूर्वेकडील तालुक्यात पावसाने दडी मारल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील 106 विहिरींची तपासणी करण्यात आली त्यामध्ये माण तालुक्यातील भूजल पातळी 3.24 मीटरने घटली आहे. हीच परिस्थिती फलटण व खटाव तालुक्यात आहे.जिल्हा भूजल
सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्यातील 106 विहिरींची पाणी पातळी तपासणी केली. जावली तालुक्यातील एका विहिरीची 0.71 मीटरने पाणी पातळी वाढली आहे. कराड तालुक्यातील 15 विहीरींपैकी 11 विहीरींची पाणी पातळी 0.40 मीटरने घटली असून 4 विहिरींमध्ये भूजल पातळीत वाढ झाली आहे. खंडाळा तालुक्यातील 2 विहिरींमधील भूजल पातळी 0.49 मीटरने खालावली असून 3 विहिरींमध्ये भूजल पातळीत वाढ झाली आहे.

खटाव तालुक्यातील 17 विहिरीपैकी 11 विहिरींची पाणी पातळी 0.95 मीटरने घटली असून 6 विहिरींमध्ये भूजल पातळीत वाढ झाली आहे. कोरेगाव तालुक्यातील 9 विहिरींपैकी 5 विहिरींची पाणी पातळी 0.46 मीटरने घटली असून 4 विहिरींमध्ये भूजल पातळीत वाढ झाली आहे. माण तालुक्यातील 16 विहिरींपैकी सर्वच्या सर्व विहिरींची पाणी पातळी 3.24 मीटरने घट झाली आहे.त्यामुळे या तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनणार आहे.

महाबळेश्‍वर तालुक्यातील एका विहिरीमधील पाणी पातळी घटली असून 2 विहिरींची पाणी पातळी 0.12 मीटरने वाढली आहे. पाटण तालुक्यातील 10 विहिरींपैकी 6 विहिरींची पाणी पातळी 0.23 मीटरने घटली आहे तर 4 विहिरींमध्ये भूजल पातळीत वाढ झाली आहे.फलटण तालुक्यातील 12 विहिरींपैकी 9 विहिरींची पाणी पातळी 1.17 मीटरने घटली आहे तर 3 विहिरींमध्ये भूजल पातळीत वाढ झाली आहे. सातारा तालुक्यातील 10 विहिरींपैकी 4 विहिरींची पाणी पातळी घटली आहे तर 6 विहीरींच्या पाणी पातळीत 0.09 मीटरने वाढ झाली आहे. वाई तालुक्यातील 8 विहिरींपैकी 7 विहीरींची पाणी पातळी 0.33 मीटरने घटली आहे तर एका विहिरींमध्ये भूजल पातळीत वाढ झाली आहे.

निरीक्षण केलेल्या विहिरींतील पाण्याच्या पातळीतील कमी अधिक वाढ व पर्जन्यमानातील झालेला फरक यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. पाण्याच्या भूजल पातळीत 0 ते 3 मीटरने घट झाल्याचे दिसून येत असल्याचे भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भू वैज्ञानिक बी.आर.टोणपे यांनी सांगितले.दरम्यान, सप्टेंबर 2013 ते सप्टेंबर 2017 मध्ये सरासरी भुजल पातळी जावली 1.11 मीटर, कराड 2.06 मीटर, खंडाळा 2.07 मीटर,खटाव 4.87 मीटर, कोरेगाव 4.19 मीटर, माण 4.19 मीटर, महाबळेश्‍वर 8.12 मीटर, पाटण 1.78 मीटर, फलटण 4.25 मीटर, सातारा 2.41 मीटर तर वाई 4.85 मीटर होती.

सातारा जिल्ह्यातील पश्‍चिम भागात पाऊस समाधानकारक झाला असला तरी पूर्व भागात पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे गावोगावी पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे. काही भागात प्रशासनामार्फत टँकर सुरू करण्यात आले आहेत. जलयुक्त शिवारमार्फत पूर्व भागात कामे झाले असली तरी पावसानंतरच त्याचा परिणाम कळणार आहे.

No comments

Powered by Blogger.