आपल्या हक्काचे डिजिटल नेटवर्क

शेखर गोरे, अंकुश गोरेंना 3 वर्षांची शिक्षा


दहिवडी : पवनचक्की प्रकल्पाच्या रस्त्याकरता एका महिलेला धमकावून जबदस्तीने तिची जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माण तालुक्यातील मातब्बर राजकारणी शेखर गोरे व त्यांचे बंधू अंकुश गोरे या दोघांना दहिवडी न्यायालयातील न्या. ए. आर. मोहने यांनी तीन वर्षांची शिक्षा व 11 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला. शिक्षेमध्ये बापू जगदाळे याचाही समावेश आहे. दरम्यान, दोघांनीही वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची त्यांनी केलेली मागणी न्यायालयाने मान्य करत त्यांना जामीन मंजूर केला. शेखर गोरे व अंकुश गोरे हे काँग्रेसचे आ. जयकुमार गोरे यांचे सख्खे भाऊ आहेत. परंतु, शेखर गोरे हे आमदार जयकुमार यांचे कडवे राजकीय विरोधक असून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत.

कस्तुरा घाडगे या महिलेने शेखर गोरे, त्यांचे बंधू अंकुश गोरे व जगदाळे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात असे म्हटले होते की, 2013 मध्ये ‘बोथे विंड मिल’ प्रकल्पासाठी काम सुरू झाले होते. त्यावेळी बोथे येथील डोंगरावरील पवनचक्की प्रकल्पासाठीचा रस्ता आपल्या शेतातून नेण्यास कस्तुरा घाडगे यांनी मनाई केली. त्यावर गोरे, जगदाळे हे जबरदस्तीने कस्तुरा यांच्या शेतात घुसले, त्यांना तिथे जबरदस्तीने थांबवून ठेवले, धमकावले व शिवीगाळ केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होेता. पवनचक्की प्रकल्पाचे कंत्राट गोरे बंधू यांनी घेतले होते. याप्रकरणी सुनावणी सुरु होती. मंगळवारी दहिवडी न्यायालयाने वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. मात्र, वरिष्ठ न्यायालयात अपील करण्याची त्यांची मागणी न्यायालयाने मान्य करत त्यांना जामीनही मंजूर केला आहे.

शेखर गोरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत. राष्ट्रवादीच्या तिकीटावर त्यांनी विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यापूर्वी त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाकडून विधानसभेची निवडणूक आपले सख्खे बंधू जयकुमार गोरे यांच्या विरोधात लढवली होती. यात शेखर गोरे यांचा पराभव झाला होता. एकूणच या निकालाने तालुक्यात खळबळ उडाली असून राजकीय पटलावर पुन्हा एकदा माण तालुका जिल्ह्यात चर्चेत आला आहे.