कराड येथे तलावात आढळला कॉलेज युवकाचा मृतदेह


कोपर्डे हवेलीः कराड तालुक्यातील राजमाची येथील तलावात कॉलेज युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित कॉलेज युवकाने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कुणाल सोपान गुंजाळ (वय १८, रा. आडगाव रेपाळ, ता. येवला, जि. नाशिक) असे तलावात मृतदेह आढळलेल्या कॉलेज युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुणाल गुंजाळ हा कराड तालुक्यातील राजमाची येथील मोकाशी फूड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. रविवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास वसतिगृहामध्ये हजेरी घेण्यात आली. त्यावेळी कुणाल गुंजाळ तेथे आढळून आला नाही. त्यामुळे त्याचा कॉलेज परिसरात शोध घेण्यात आला. मात्र, तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर त्याच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला असता त्याने फोन उचलला नाही. वसतिगृहात रुमवर फोन ठेवून तो बाहेर गेला होता. 'मी येथे सापडलो नाही तर तळ्यावर येऊन शोधा' अशा प्रकारचा मेसेज कुणाल गुंजाळ यांनी मोबाईल वरती टाईप करून ठेवला होता.

दरम्यान, कुणाल गुंजाळ बेपत्ता असल्याची फिर्याद रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पोलिसात देण्यात आली होती. सोमवारी सकाळी त्याचा शोध सुरू केला असता दुपारी एक वाजण्याच्या सुमारास राजमाची तलावामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला. या प्रकाराने परिसरात खळबळ उडाली आहे.

No comments

Powered by Blogger.