राफेल व्यवहारात मध्यस्थी नसल्‍याने काँग्रेसची पोटदुखी; प्रकाश जावडेकरसातारा : शंभर वेळा खोटं बोललं तरी ते खोटं खरं होत नाही. सत्य नसेल तेव्हा खोटं टिकत नाही. राफेल व्यवहाराबाबत आता फक्त आरडाओरड सुरू आहे. याला काही अर्थच नाही. ही 'सरकार टू सरकार' अशी डील आहे. काँग्रेसचे असे दुःख आहे की, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात मध्यस्थाशिवाय कोणता व्यवहारच केला नाही. या व्यवहारात मध्यस्थ नाही हीच काँग्रेसची पोटदुखी आहे. असा घणाघात केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला.रयत शिक्षण संस्थेच्या शतकोत्तर महोत्सव शुभारंभप्रसंगी प्रकाश जावडेकर हे साताऱ्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना जावडेकर म्‍हणाले, ‘‘मी कोळसा घोटाळ्याचा आरोप यूपीए सरकारवर केला होतो त्‍यावळी आम्ही त्याबाबतचे पुरावे सादर केले होते. त्यामुळे हा घोटाळा झाल्याचे सिद्ध झाले. त्यानंतर कॅगचा अहवालही तसाच आला. माझ्या मागणीवरून सीबीआय चौकशी झाली. या चौकशीत सर्व सत्य समोर आल्यानंतर न्यायालयात मॉनिटरिंग करण्यात आले व यावरूनच न्यायालयाने कोळसा खाणींची लायसन्स रद्द केली आहे आणि पुराव्यानिशी भ्रष्टाचार उघडकीस आणला. काँग्रेसने त्यावेळी हा व्यवहार जवळपास पूर्ण केला होता. परंतु, त्यांना मध्यस्थी मिळाला नाही. त्यामुळे हा विभाग रखडला असल्याची टीका जावडेकर यांनी केली.

भाजप विरोधकांना कोणताही मुद्दा हाताशी नसताना हा मुद्दा ओढून-ताणून आणून त्यावर चर्चा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पण शेतकऱ्यांपासून ते सामान्यांपर्यंत आणि गरीबांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत मोदींच्या विकास योजनांचा फायदा होत असल्यामुळे लोक आमच्या सोबत आहेत. महाराष्ट्रामध्ये लगतच्या कालावधीत २७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यामध्ये भाजपने २०० ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे.

त्यामुळे केवळ २०१४ नव्हे तर पूर्ण चार वर्षांमध्ये भाजपची मोठी वाढ झाली आहे. लोकांना आता सुशासन हवे आणि त्यासाठी लोक मतं देत आहेत. जातीचे राजकारण किंवा खोटे नाटे प्रचार करून लोक बळी पडत नाहीत. म्हणूनच अमेठी येथे राहुल गांधी दौऱ्यावर गेले होते त्यावेळी तेथील लोकांनी आम्ही यापुढे नरेंद्र मोदी यांनाच मतं देणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते. नरेंद्र मोदी यांनी स्वतःहून कामं केली आहेत, तुम्ही काहीच केले नाही. विरोधकांकडे कोणताही सकारात्मक विचार नसल्याने ही परिस्थिती उद्भवली असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.

दरम्यान, राफेलच्या मुद्द्यावर खासदार शरद पवार यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे तुमचे त्यांच्यावरील प्रेम वाढले आहे काय? असे विचारले असता जावडेकर म्हणाले, असे काही नाही माझे रयतवर प्रेम असल्यामुळेच मी या ठिकाणी आलो असल्याचे सांगितले.

No comments

Powered by Blogger.