शहर बनले ‘चकाचक’


कराड : गेल्या वर्षभरापासून कराडमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून शहरातील सर्व कॉलनी, शाळा, महाविद्यालये, गल्‍ली बोळे, बागा,झोपडपट्टी, स्मशानभूमी, मोकळे प्लॉट स्वच्छ करण्यात आले आहेत. दररोज सकाळी 7 वाजता पालिकेचे कर्मचारी स्वच्छता करत असून कराड चकाचक ठेवण्यात आघाडी घेतली आहे.

सर्वेक्षणमध्ये भाग घेत देशात 39 वा क्रमांक मिळवला. स्वच्छतेबाबत दररोज आराखडा तयार करत शहर स्वच्छतेच्यादृष्टीने पालिकेच्या आरोग्य विभागाने वर्षभर मेहनत घेतली त्याचे यश म्हणूनच कराडला नंबर मिळवता आला. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये प्रथम क्रमांक पटकाविलेल्या इंदोर शहराला मुख्याधिकारी, पदाधिकार्‍यांसह आरोग्य कर्मचार्‍यांनी भेट दिली. त्यानंतर इंदोरप्रमाणेच कराड स्वच्छ राहण्यासाठी शहरात दररोज स्वच्छता मोहिम राबवत शहरातील सध्या शहरात सर्व बागा, शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, हॉटेल, सार्वजनिक शौचालये, वैयक्‍तिक शौचालये, व्यापारी पेठा आदी स्वच्छ राहण्यासाठी पालिका दक्ष राहात आहे.

शहरातील बारा डबरी परिसर, शनिवार पेठ वाढीव भाग, मुजावर कॉलनी, दरवेशी वस्ती, सुमंगलनगर डवरी वस्ती, बसस्थानक परिसर, शाळा यासह शहरातील विविध भागात किटकनाशक धूर व स्प्रेपंप फवारणी करण्यात येत आहे. शहरात ठिकठिकाणी नागरिकांना ओला व सुका कचरा बद्दल माहिती देण्यात येवून जनजागृती करण्यात येते. शहरात ओला व सुका कचरा विलगीकरण करण्यात येत असल्याने त्यावर प्रक्रिया करणे सोपे जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षणच्या निमित्ताने नागरिकांमध्ये स्वच्छतेची जागृती झाली. नागरिक जागरूक राहात असल्याने पालिकेचीही जबाबदारी वाढली आहे. स्वच्छतेत सातत्य ठेवणे ही महत्वाची जबाबदारी नागरिक व पालिकेची राहणार आहे

No comments

Powered by Blogger.