जिहे-कठापूर आता स्व. लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजना ना. गिरीश महाजन


खटाव : गुरूवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार या खटावच्या सुपुत्राने केलेल्या सुसंस्कारामुळे या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा जागतिक नेता मिळाला. त्यामुळे रखडलेली माण-खटाव तालुक्याची रक्‍तवाहिनी असणारी जिहे-कठापूर उपसा सिंचन योजना या पुढील काळात ‘गुरूवर्य स्व. लक्ष्मणराव इनामदार जलसिंचन योजना’ या नावाने शासन दरबारी ओळखली जाणार असल्याची घोषणा राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांनी केली. दरम्यान, या योजनेसाठी 150 कोटी रुपयांची आता तरतूद केली असून, येणार्‍या काळात वाट्टेल तेवढा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू खटाव गावचे सुपुत्र स्व.लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खटाव येथील गौरीशंकर कॉलेज मैदानावर आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. युवा नेते महेश शिंदे यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री ना. चंद्रकांत पाटील, खा. संजय पाटील, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, सदाशिव खाडे, मकरंद देशपांडे, भरत अमळकर, विक्रम पावस्कर, अनिल देसाई आदी उपस्थित होते.

ना. गिरीष महाजन म्हणाले, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या कार्यकाळात जलसिंचनाच्या कामांना निधी दिला गेला नाही. त्यामुळे माण-खटावसारख्या अनेक तालुक्यांच्या वाटयाला दुष्काळ आला. भाजपा-सेना युतीची सत्‍ता येताच राज्य शासनाच्या माध्यमातून जलसिंचनासाठी 8 हजार कोटींची तरतूद केली. सिंचन कामातील अडथळे दूर केले. जिहे क ठापूर योजनेलाही केंद्रीय जलआयोगाची मान्यता देवून तिचा समावेश केंद्राच्याच बळीराजा योजनेंतर्गत झाल्याने या योजनेतील निधीचे सर्व अडथळे दूर झाले आहेत. 

जिहे-कठापूर योजनेवर आज अखेर 375 कोटी रू.खर्च झाले असून उरलेले 850 कोटी रूपये येत्या दीड वर्षात शासनाकडून उपलब्ध होणार आहेत. आता या योजनेसाठी 150 कोटी रुपयांची आपण तरतूद केली आहे. त्यामुळे माण खटाव तालुक्यातील जवळपास 70 हजार एकरावरील शेतीला पाणी उपलब्ध होवून दुष्काळाचा कलंक कायमचा पुसला जाण्याचा विश्‍वास ना. महाजन यांनी व्यक्‍त केला. शासनाने नुकताच एक निर्णय घेतला असून शेतकर्‍यांच्या शेतीच्या एकूण विजबिलापैकी 81 टक्के वीजबिल आता शासन भरणार आहे. केवळ 19 टक्के विजबिलच शेतकर्‍याला भरावे लागणार आहे, असेही ते म्हणाले. 

ना. चंद्रकांत पाटील म्हणाले, माण खटाव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या शेतीसाठी असणार्‍या जिहेकठापूर उपसा सिंचन योजना केंद्रीय जलआयोगाच्या मान्यतेमुळे पुढील दीडवर्षाच्या कालावधीत पूर्ण होईल. महेश शिंदे हा युवा नेता मतदार संघाला विकासाच्या वाटेवर नेणार आहे. त्यांना सर्वांनी साथ द्यावी. आम्ही मतदारसंघात परिवर्तन करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धारही चंद्रकांत पाटील यांनी केला.

युवा नेते महेश शिंदे म्हणाले, गेली 65 वर्षे सत्‍तेत राहून आमच्या माण, खटाव, कोरेगाव तालुक्याला दुष्काळाच्या खाईत ढकलणार्‍या काँग्रेस व राष्ट्रवादीला येणार्‍या निवडणुकीत कायमचा धडा शिकवायचा आहे. या मतदारसंघातील घडयाळाची टिक-टिक कायमची बंद करून तिथे कमळ फुलवायचे आहे. जिहे-कठापूर, वसना-वांगना सिंचन योजना दुष्काळी भागातील शेतजमिन पाण्याखाली आणून दुष्काळाचे निवारण कायमस्वरूपी करणार आहे.

डॉ. दिलीप येळगावकर म्हणाले, आ. शशिकांत शिंदे यांनी आ. जयकुमार गोरे यांच्याशी तडजोड करत स्वत:चा मतदार संघ सेफ करुन घेतला व माण तालुक्याला केवळ पंधरा दिवसांचे पाणी देवून पाच वर्षे होरपळत ठेवण्याचे महापाप केले आहे. त्यामुळे जनताच आता येणार्‍या निवडणुकीत त्यांचे पाप त्यांच्याच पदरात टाकल्याशिवाय राहणार नाही, असे डॉ. येळगावकर म्हणाले.

यावेळी शेखर चरेगावकर, अनिल देसाई, संजय पाटील, भरत अमळकर यांची भाषणे झाली. मेळाव्यास खटावचे सरपंच रत्नप्रभा घाडगे, शशिकांत कदम, महेंद्र जगताप, प्रभाकर साबळे, रत्नाकर जगताप,मदन जगताप, प्रकाश पाटील, जालिंदर वाघ, अनिरूध्द जगताप, निताताई केळकर, शिवाजीराव बर्गे, सुनिल फाळके आदी उपस्थित होते.

No comments

Powered by Blogger.