खासदार उदयनराजेंचे राजकीय ‘सीमोल्‍लंघन’


सातारा : राज्याचे लक्ष वेधून घेणारे सातार्‍यातील शाही सीमोल्‍लंघन यावर्षी दणक्यात साजरे करण्यासाठी सातारा विकास आघाडीतील पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर साजर्‍या होत असलेला हा शाही सोहळा म्हणजे राजकीय ‘सीमोल्‍लंघन’ ठरणार आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना केल्या.खा. उदयनराजे भोसले यांनी ‘जलमंदिर पॅलेस’ येथे सातारा विकास आघाडीचे जिल्हा परिषद, पंचायत समिती, सातारा पालिकेतील आजी-माजी पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची बैठक घेतली. दसर्‍या दिवशी ‘जलमंदिर पॅलेस’ येथे सीमोल्‍लंघनाचा सोहळा पार पडणार आहे. 

खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते व राजमाता श्री. छ. कल्पनाराजे भोसले, श्री. छ. सौ. दमयंतीराजे भोसले यांच्या उपस्थितीत भवानी तलवारीची विधिवत पूजा केली जाणार आहे. त्यानंतर भवानी तलवारीची शाही मिरवणूक राजवाडा-मोती चौक-देवी चौक-कमानी हौद- चौक-शेटे चौक-खालच्या रस्त्याने पोवई नाक्यावर येणार आहे. शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात येणार आहे. त्याठिकाणी उभारलेल्या आकर्षक मंडपात भवानी तलवारीची विधीवत पूजा करुन पुन्हा ही मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात जलमंदिरपर्यंत जाणार आहे.

यावर्षी शाही सीमोल्‍लंघन दणक्यात साजरे करण्याची इच्छा कार्यकर्त्यांनी खा. उदयनराजे यांच्याकडे व्यक्‍त केली आहे.मिरवणूक मार्गावर शुभेच्छा फलक लावले जाणार आहेत. याशिवाय सातारा तालुक्यासह जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर खा. उदयनराजे यांनी साविआचे पदाधिकारी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांना सूचना केल्या. यावर्षी आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा होत असलेला हा शाही सोहळा म्हणजे खा. उदयनराजेंचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूवीवरील राजकीय सीमोल्‍लंघन ठरणार असल्याची चर्चा सातार्‍यात सुरु झाली आहे.

No comments

Powered by Blogger.