Your Own Digital Platform

कराडच्या मुख्याधिकाऱ्यांना निलंबीत करा : झाकीर पठाण


कराड : कराड शहरातून जाणाऱ्या कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका या मुख्य रस्त्याच्या निकृष्ट कामाची चौकशी स्वतंत्र समितीमार्फत करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाका व त्याला पाठिशी घालणारे कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांना निलंबीत करा, अशी मागणी कॉंग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. याबाबत जिल्हाधिकारी यांना पुराव्यासह भेटणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

झाकीर पठाण म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी निमित्त कराड शहरातील विकासकामांसाठी शंभर कोटींचा विशेष निधी मंजूर केला होता. या निधीतून अन्य कामांबरोबरच कृष्णा नाका ते कोल्हापूर नाक चौपदरीचे काम करण्यात आले. यासाठी ११ कोटी रूपये खर्च दाखविण्यात आला आहे. वास्तविक रस्त्याचे निकृष्ट काम पाहिल्यानंतर हा ११ कोटींचा रस्ता आहे का? असा प्रश्न पडतो. गटर्स, डिव्हायडर यांची कामे अपुरी आहेत. या कामात भ्रष्टाचार झाला आहे.

या निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी करावी अशी लेखी मागणी ९ मे २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. याची दखल घेवून जिल्हा प्रशासनाने याबाबत कराडचे मुख्याधिकारी यांना रस्ता कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र मुख्याधिकारी यांनी याबाबत टाळाटाळ केली. आम्ही पाठपुरावा केल्यानंतर मुख्याधिकाऱ्यांना स्मरणपत्र काढण्यात आले. हे पत्र बुधवार दि. 24 रोजी कराड पालिकेला प्राप्त झाले. दरम्यान असे काही पत्र आलेच नाही अशी खोटी माहिती मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी माध्यमांना दिली.

 यावरून ते संबंधित ठेकेदाराला पाठिशी घालत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी व निकृष्ट कामाची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी झाकीर पठाण यांनी केली आहे.