खुल्या प्रवर्गातील शिक्षक पदोन्नती रखडली


सातारा : राज्यातील इतर जिल्हा परिषदांमध्ये खुल्या प्रवर्गातील विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना पदोन्नती देण्यात आल्या. मात्र, सातारा जिल्हा परिषदेने अद्यापही खुल्या प्रवर्गातील पदोन्नतीची प्रक्रिया गेल्या 4 वर्षांपासून रखडवली असल्याने खुल्या प्रवर्गातील शिक्षकांमधून संताप व्यक्त होत आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने दोन वेळा आदेश काढूनही झेडपीच्या प्राथमिक शिक्षण विभागाने व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याने खुल्या वर्गाने संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, खुल्या वर्गातील शिक्षकांनी याबाबत मराठा क्रांती मोर्चाशी चर्चा केली असून मराठा क्रांती मोर्चा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाला असा अन्याय का करीत असल्याबाबत जाब विचारणार आहे.

खुल्या प्रवर्गातील विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना पदोन्नत्या देण्यासंदर्भात वेळोवेळी मागणी करूनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे. अनेकवेळा तोंडी व लेखी निवेदनही शिक्षक संघटनांनी दिली मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही.त्यामुळे न्याय कोणाकडे मागायचा असा प्रश्‍न खुल्या प्रवर्गातील शिक्षकांना पडला आहे.

राज्यातील उस्मानाबाद, नांदेड, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, रत्नागिरी, सांगली, बीड आदी जिल्हा परिषदांमध्ये खुल्या प्रवर्गातील विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना पदोन्नत्या शासनाच्या आदेशानुसार दिल्या आहेत. खुल्या प्रवर्गातील कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यासंदर्भात राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दि. 29 डिसेंबर 2017 व 11 ऑक्टोबर 2018 रोजी दोनवेळा जिल्हा परिषदांना आदेश दिले होते. मात्र, या आदेशालाच सातारा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने हरताळ फासला आहे. त्याबरोबरच संबंधित शिक्षकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. सेवाज्येष्ठ असूनही पदोन्नतीपासून वंचित राहण्याची वेळ या शिक्षकांवर आली आहे.

सातारा जिल्ह्यातच जिल्हा परिषदेने खुल्या प्रवर्गातील विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुखांना पदोन्नत्या दिल्या नसल्याने एकप्रकारे अन्याय केला आहे. गेल्या 4 वर्षांपासून पदोन्नतीची प्रक्रिया रखडली आहे. शिक्षकांनी झेडपीतील मुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची भेट घेवून उंबरे झिजविले. मात्र, त्यावर कोणताही तोडगा अद्यापही निघाला नाही. विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख यांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने प्रशासकीय कामाचा पुरता बोजवारा उडाला आहे. वेळोवेळी जिल्ह्यातील पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या भेटी घेवूनही शिक्षकांच्या वाट्याला निराशाच आल्याचे चित्र सातारा झेडपीत पहावयास मिळत आहे. राष्ट्रीय पातळीवर विविध पुरस्कार घेणारी झेडपीच खुल्या वर्गातील शिक्षकांवर अन्याय करीत असेल तर शिक्षकांनी कोणकडे अपेक्षा ठेवायची? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

या पदोन्नत्या न दिल्याने खुल्या प्रवर्गाला झेडपी प्रशासनामार्फत दुजाभावाची वागणूक दिली जात आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे याबाबत काय भूमिका घेणार? असा सवाल अन्यायग्रस्त शिक्षकांमधून उपस्थित होत आहे. जिल्ह्यात अधिकारी व शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम झाला आहे.

No comments

Powered by Blogger.