Your Own Digital Platform

मुलांना माहित आहे का ‘स.न.वि.वि.’


सातारा : संदेशवहन अथवा दळणवळणाच्या क्षेत्रात भारतीय टपाल सेवेचे पत्र हा प्रकार दुर्मीळ झाला आहे. त्यामुळे टपालात नेहमी लिहिले जाणारे ‘सप्रेम नमस्कार, विनंती विशेष’ हे आपुलकीचे शब्द परवलीचे बनले आहेत. शालेय अभ्यासक्रमात पत्रव्यवहार शिकवला जात असला तरी पोस्टाच्या पत्रातील ‘स.न.वि.वि.’ हे शब्द बहुतांश मुलांना माहितदेखील नसल्याचे चित्र आहे. ‘स.न.वि.वि.’मुळे माणसा माणसातील असणारा जिव्हाळा आता केवळ शालेय अभ्यासक्रमापुरताच मर्यादित राहिला आसध्याचे युग हे गतिमान युग आहे.

 या गतिमान युगात फोन, मोबाईल यासारख्या संपर्क यंत्रणा मोठ्या प्रमाणात विकसित झाल्याने गावोगावी, चौकाचौकात टांगलेल्या लाल रंगाच्या टपालपेट्या आता शोपीस बनत आहेत. प्रत्येकाचे नातेवाईक, परिचित माणसे वेगवेगळ्या गावात राहतात. या नातेवाईकांना निरोप देणे, आमंत्रण देणे यासाठी आता मोबाईलचा सर्रास वापर होत आहे. फार पूर्वी निरोप पाठवणारा माणूस पायी जात असे. कधी तो घोड्यावरून अथवा उंटावरून जात असे. परंतू इंग्रजांच्या काळात भारतात प्रथम टपाल व्यवस्था सुरू झाली. यामध्ये साध्या 50 पैशाच्या कार्डावर किंवा आंतरदेशीय पत्रावर मजकूर लिहून ते पोस्टाच्या पेटीत टाकले जाते. 2 ते 3 दिवसांनी तो निरोप त्या व्यक्तीला मिळत असे. फार पूर्वी निरोपाची देवाणघेवाण होण्यासाठी कबुतरांचाही वापर होत असे.

शिवकालीन पत्रव्यवहारामध्ये छ. शिवाजी महाराजांनी प्रत्येक कामाच्यासंदर्भात आठ खाती तयार केली होती. त्याला अष्टप्रधान मंडळ असे नाव होते. त्यामध्ये पत्रव्यवहार सांभाळणे हे काम एखाद्या व्यक्तीला नेमून दिले जायचे आणि तो व्यक्ती आलेली पत्रे, आज्ञा, हुकूम इ. जपून ठेवणे किंवा एखाद्या राज्यात पत्र, आज्ञा किंवा आदेश घेऊन घोड्यावर बसून जात असे. यामध्ये बराच कालावधी जात असे व पत्रव्यवहाराची देवाणघेवाण होण्यात अडचणी यायच्या. त्यानंतर मात्र इंग्रजांनी व्यापाराच्या निमित्ताने भारतात पाय रोवले. हळूहळू आपला देश ताब्यात घेतला. इंग्रजांनीही रेल्वे, टपाल यासारख्या यंत्रणेचे महत्व लक्षात घेवून टपालसेवा सुरू केली.

जवळच्या किंवा दूरच्या अंतरावरील माणसाशी आता थेट मोबाईलवरूनच संपर्क साधला जातोय. त्यामुळे पत्रव्यवहाराची परंपरा जवळपास संपुष्टात आली आहे.