Your Own Digital Platform

शालेय मुलाची खिशात चिठ्ठी ठेवून आत्महत्या


कराड : शहरातील संत तुकाराम हायस्कूल मुलांच्या वस्तीगृहामध्ये 13 वर्षांच्या शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. रविवार दि. 28 रोजी रात्री ही घटना घडली. दरम्यान, संबंधित मुलाच्या खिशात दोन चिठ्ठ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. सुरज शहाजी पवार (वय 13) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सुरज हा मित्रांसह संत तुकाराम हायस्कूल मुलांच्या वसतिगृहातील खोलीत राहत होता. 

रविवारी रात्री खोलीतील इतर मुले झोपल्यानंतर सुरजने वसतीगृहात रहात असलेल्या खोलीमध्ये बेडशीटची दोरी तयार करून पंख्याला गळफास घेतला. ही बाब खिडकीतून इतर मुलांना दिसली. त्यांनी त्वरित याबाबत चौकीदारांना कल्पना दिली. शिपायांनी दरवाजा वाजवून इतर मुलांना उठवले. याबाबतची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे घटनास्थळी दाखल झाले. माहिती घेत असताना त्यांना सुरजच्या खिशात दोन चिठ्ठ्या सापडल्या. चिठ्ठीतील मजकूर समजू शकला नाही. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबची खबर वस्तीगृहाचे चौकीदार माणिक ईश्‍वरा लोंढे यांनी शहर पोलीस दिली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार एस. एम. सपाटे करत आहेत.