बनावट दस्तऐवज तयार करणाऱ्या चौघांना अटक


मारूल हवेली : विहे ( ता.पाटण ) येथील मयत व्यक्तींच्या संमतीपत्रावर खोट्या सह्या करून बनावट दस्ताऐवज तयार केल्याप्रकरणी पाच जणांवर पाटण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतची फिर्याद सेवानिवृत्त न्यायाधीश यांनी दिली आहे.प्रकाश बाळासो संकपाळ ( वय ४३, रा. म्होप्रे ता. कराड), मधुकर शंकर संकपाळ ( वय ५५, रा. म्होप्रे), पांडुरंग धोंडीबा लाड ( वय ६१, रा. मलकापूर ता. कराड), धनाजी हिंदुराव संकपाळ ( वय ३७, रा. विहे) अशी पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर वसंत राजाराम संकपाळ (रा. म्होप्रे) यास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

मयत व्यक्तींच्या खोट्या सह्या करून तसेच फिर्यादी यांच्या मुलाच्या खोट्या सह्या करून बनावट दस्ताऐवज तयार केल्याची फिर्याद पांडुरंग धोंडीराम संकपाळ ( रा.विहे ) यांनी मल्हारपेठ पोलिस दूरक्षेत्रात दिली आहे. संशयित आरोपी यांनी संगनमताने रोहन पांडुरंग संकपाळ यांच्या संमतीपत्रावर खोट्या सह्या करून बनावट दस्ताऐवज तयार केला. तसेच विठ्ठल लक्ष्मण संकपाळ, सिताराम केशव शिंदे व ज्ञानू विठू संकपाळ या मयत व्यक्तींच्या संमतीपत्रावर व प्रतिज्ञापत्रावर खोट्या सह्या करून बनावट दस्ताऐवज तयार केला.

विहे ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी सदर संमतीपत्रावर ओळख म्हणून सही केली आहे. याबाबतची फिर्याद दिल्याने मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीच्या नावे स्टॅम्प पेपर विकत घेऊन संमतीपत्र व प्रतिज्ञापत्रावर खोट्या सह्या केल्या होत्या. हे संमतीपत्र उपकार्यकारी अभियंता टेंभू, उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग ओगलेवाडी ( ता. कराड ) यांच्याकडून गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी जप्त केले आहे. संशयित आरोपींकडे गुन्ह्याच्या अनुशंगाने विचारपूस केली असता ते उडवा-उडवीची व असमाधानकारक उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.