घरोघरी लगबग; स्वागताचीही जय्यत तयारीसातारा :

चला दीप उजळू नवे स्नेहाचे
मनोमनी, राहो नाते हे मांगल्याचे, 

अशा मंगलदायक वातावरणात दीपावलीचे स्वागत करण्यासाठी अवघे सातारकर सज्ज झाले आहेत. दिवाळीची धामधूम शिगेला पोहोचली आहे. घरोघरी लगबग सुरू झाली असून विद्यार्थ्यांनाही लवकरच दिवाळीची सुट्टी सुरू होत आहे. त्यामुळे अवघे जनजीवन दीपोत्सवाच्या वातावरणाने आत्तापासूनच भारावून गेले आहे. सगळीकडे या सणाचा माहोल तयार झाला असून बाजारपेठ अक्षरश: नटली आहे.दिवाळी, धनत्रयोदशी, नरकचतुर्थी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज या पाच सांस्कृतिक विचारधारा असलेला असा हा सणांचा उत्सव आहे. दिवाळी या एकाच शब्दात जीवनाचं सार, मांगल्य सामावलं आहे. पणत्यांचं तेज, कंदिलाची शोभा, रांगोळ्याचं सौंदर्य, आकाशातली रोषणाई अशा मनमोहक वातावरणाने आसमंत उत्साहाने भरून जाणार आहे. हा वर्षातील सर्वात मोठा व आनंदाचा सण आहे. म्हणूनच ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असं बोललं जातं. अबालवृध्द हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असतात. यंदाही तेच तेज घेवून दीपावली येणार आहे.

बाजारामध्ये जीवनावश्यक वस्तू खरेदीबरोबरच कपडे व दिवाळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी धांदल उडाली आहे. अनेकांनी बाजार व बजेटचा अंदाज घेवून खरेदी सुरू केली आहे. दिवाळीचे जय्यत स्वागत करण्यासाठी सर्वत्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. मोबाईल, सोशल नेटवर्कींगच्या जमान्यातही दिवाळीचा शुभसंदेश पोहोचविण्यासाठी नागरिकांकडून ग्रिटींग्ज कार्डस्ना पसंती दिली जात आहे. दिवाळीच्या शुभेच्छा देणारी विविध ग्रिटींग्ज तरूणाईला भुरळ पाडत आहेत. ज्ञानदेवाच्या अभंगापासून आधुनिक कवितेपर्यंत नेमक्या शब्दांत शुभेच्छा व्यक्‍त करणारी ग्रिटींग्ज लक्ष वेधून घेत आहेत.

सातारा शहर परिसरातील बाजारपेठेत लक्ष्मीपूजनासाठी लागणार्‍या केरसुणी व पुजा साहित्य, विविध रंगातील आकाशकंदील, पणत्या, रांगोळीचे रंग, रेडीमेड फराळ, किराणा साहित्यासह, कपडे, फटाका, भेट वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची सर्वच दुकानात गर्दी झाल्याने दुकाने हाऊसफुल्ल झाली आहेत.. या वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल राहिला. सायंकाळनंतर शहरातील सर्वच्या सर्व रस्ते ग्राहकांच्या गर्दीने फुलून जात आहेत. त्यामुळे बाजारपेठेत कोट्यवधी रूपयांची उलाढाल सुरू आहे.

No comments

Powered by Blogger.