वाईत ८ वर्षीय चिमुरडीचा खून ?


वाई : वडवणी, ता. वाई येथील आठ वर्षीय चिमुरडी साक्षी शंकर चिकणे हिचा मृतदेह गावातील एका विहिरीत सापडला आहे. सोमवारी तिच्या वडिलांनी साक्षी बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. त्यानंतर बुधवारी तिचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, दि. 14 रोजी साक्षी ही दुपारी गावातील भैरवनाथ मंदिराजवळ खेळत असताना बेपत्ता झाली होती. साक्षी बेपत्ता झाल्यानंतर दिवसभर तिच्या कुटुंबाने व नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नव्हती. त्यामुळे तिचे वडील शंकर चिकणे यांनी वाई पोलिस ठाण्यात साक्षी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार पोलिसांकडून तपासही सुरू होता. 

मात्र, बुधवारी दुपारी गावाला पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत साक्षीचा मृतदेह तरंगताना काही लोकांना दिसला. यानंतर तत्काळ नागरिकांनी पोलिसांना याची कल्पना दिली. पोलिसांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने साक्षीचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढला. दरम्यान, साक्षी ज्या मंदिर परिसरात खेळत होती तेथून तिचे घर जवळच होते. त्यामुळे ती अचानक कुठे बेपत्ता झाली असेल? असा सवाल उपस्थित होत आहे.

साक्षीचे अपहरण करून खून केला असल्याची चर्चा वडवणी परिसरात सुरू होती. यामुळेच गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. साक्षीचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रूग्णालयात न करता सातार्‍यातील जिल्हा रूग्णालयात करणयात आले. मृतदेहाच्या शवविच्छेदन अहवालानंतरच सर्व काही स्पष्ट होणार आहे. या घटनेनंतर गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

No comments

Powered by Blogger.